घराची तोडफोड व चोरीच्या गुन्ह्यातील दोघे फरार अटकेत

जळगाव : जुन्या भांडणासह मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरातील सामानाची तोडफोड व रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी दोघा फरार संशयीतांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अविनाश रामेश्वर राठोड (22) रा. रेणुकानगर, भिलाटीच्या मागे, मेहरुण जळगाव आणि  ललीत उमाकांत दिक्षीत (23) ईश्वर कॉलनी, दत्त मंदिराजवळ, पंचमुखी हनुमान मंदीराच्या मागे, जळगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. 15 मार्च 2022 रोजी घडलेल्या या घटनेतील आठपैकी पाच जणांना यापुर्वी अटक करण्यात आलेली असून एकाची अटक  बाकी आहे.

जुना वाद आणि हाणामारीचा बदला घेण्याच्या सुडभावनेतून 15 मार्च 2022 रोजी शहरातील कासमवाडी भागातील आशा गोपाल चौधरी यांच्या घरावर तरुणांच्या टोळक्याने हल्ला चढवला होता. या घटेनेत रोख रकमेसह सोन्याचे दागीने चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल उर्फ सुन्ना रसाल राठोड, संजय रसाल राठोड, विशाल पदमसिंग परदेशी, रुपेश संजय सपकाळे, गणेश भास्कर सोनार, अविनाश रामेश्वर राठोड, उदय राठोड व ललीत उमाकांत दिक्षीत अशा सर्वांविरुद्ध सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल रसाल राठोड यास आशा गोपाल चौधरी यांचा मुलगा सोनु गोपाल चौधरी व त्याच्या साथीदारांनी मिळून मारहाण केली होती. त्यामुळे अनिलचा भाऊ सुनिल राठोड, विशाल पदमसिंग परदेशी व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून 15 मार्चच्या भल्यापहाटे अडीच वाजता आशाबाई यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत घरातील सामानाची लाकडी काठयांनी तोडफोड केली होती. या तोडफोडीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय 1 लाख रुपये रोख व 1 लाख 35 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आशा चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील पाच जणांना अटक करण्यात आली होती. फरार असलेल्या अविनाश रामेश्वर राठोड आणि ललीत उमाकांत दिक्षीत या दोघांना अटक करण्यात आली आहे. फरार असलेले दोघे संशयीत आरोपी जैनाबाद परिसरात लपून बसले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्या  माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील, प्रदीप पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील आदींनी सापळा रचून दोघांना जैनाबाद परिसरातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. दोघांना न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले. आरोपीतांविरुद्ध यापुर्वी दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here