जळगाव : पाचोरा येथील रहिवासी असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम ठेकेदाराची जळगाव शहरात मध्यरात्री लुट करण्यात आली. लुट करणा-या दोघांपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अभिलाष रमेश येवले (28) रा. वाणी अर्पाटमेंट, कृष्णाजी नगर, भडगाव रोड पाचोरा असे लुट झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश अरुण जोशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर असून लवकरच त्याला देखील अटक केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मार्च एडींगची कामे पुर्ण करुन मध्यरात्री जळगाव येथून पाचोरा जाण्यासाठी ठेकेदार अभिलाष येवले वाहनाची वाट बघत असतांना 28 मार्चच्या रात्री 1.45 वाजता हा लुटीचा प्रकार घडला.
अभिलाष रमेश येवले हे कामानिमीत्त नेहमी पाचोरा ते जळगाव खासगी वाहनाने ये जा करत असतात. दिनांक 27 मार्च 2022 रोजी ते नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी खासगी (कालीपिली) प्रवासी वाहनाने पाचोरा येथुन जळगाव येथे जिल्हा परीषद कार्यालयात आले होते. मार्च अखेर असल्याने त्यांचे कामकाज 28 मार्चच्या रात्री एक वाजेपर्यंत चालले. कामकाज आटोपल्यानंतर त्यांना त्यांचे समव्यावसायीक ठेकेदार ओम जॉगीड यांनी त्यांच्या कारने शिरसोली नाक्यावरील नुक्कड वडापाव या जागी सोडले. तेथून ते पाचोरा येथे जाण्यासाठी खासगी वाहनाची प्रतिक्षा करत उभे राहिले.
दरम्यान एका मोटारसायकलवर दोघे अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. तुम्ही कुठे जात आहात असे दोघा मोटारसायकलस्वारांनी त्यांना विचारले. मला पाचोरा येथे जायचे आहे असे त्यांनी दोघांना उत्तर देतांना सांगितले. आम्ही देखील पाचोरा येथे जात आहोत असे सांगून त्यांनी त्यांना मोटार सायकलवर बसण्याची सक्ती सुरु केली. मात्र दोघे अनोळखी असल्यामुळे अभिलाष येवले यांनी त्यांच्या मोटार सायकलवर बसण्यास नकार दिला.
आपले ऐकत नसल्याचे बघून दोघा अनोळखी मोटार सायकलवरील इसमांनी त्यांना एकेरी भाषेत दरडावण्यास सुरुवात केली. तु पाचोरा जाणारा दिसत नाही, तु येथे कुणाचा तरी खून करण्यासाठी आला आहे, तुझ्याकडे चाकु आहे, आम्हाला तुझी झडती घेवु दे असे ते बोलु लागले. तेव्हा येवले यांनी त्यांना माझ्या कडे चाकू नाही असे म्हणत अंगझडती घेण्यास नकार दिला. मात्र दोघे जण त्यांची बळजबरी झडती घेऊ लागले. आपल्याला प्रतिकार होत असल्याचे बघून दोघा अनोळखी इसमांनी येवले यांच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. त्यांच्याकडील तिस हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पाकीटातील सहा हजार रुपये रोख तसेच आधार व पॅन कार्ड काढून घेत शिरसोली गावाच्या दिशेने पलायन केले. या प्रकाराने घाबरुन गेलेले येवले यांनी पायी पायी सिंधी कॉलनी परिसर गाठला. दुस-याच्या मोबाईलने त्यांनी सह व्यावसायिक ओम जांगीड यांचेशी संपर्क साधला. ओम जांगीड यांनी त्यांना रेल्वे स्टेशनला सोडलेले. त्यानंतर येवले यांनी सकाळी पाचोरा गाठले.
त्यानंतर 29 मार्च रोजी त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा अज्ञात इसमांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. कुमार चिंता यांनी भेट दिली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी डॉ.चिंता यांनी पो.नि.प्रताप शिकारे व त्यांच्या सहका-यांना सुचना दिल्या. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा सिंधी कॉलनी परिसरात राहणारा आणि वावरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश अरुण जोशी याला कंजरवाडा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सचिन मुंडे, किशोर पाटील, मुकेश पाटील आदींनी त्याला ताब्यात घेतले. फिर्यादीत नमुद वर्णनासोबत त्याचे वर्णन मिळतेजुळते निघाले. त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला अटक करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.