जळगाव : दिड वर्षापुर्वी पतीचे निधन झालेल्या तरुण विधवेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एकास अटक करण्यात आली आहे. मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव असे एमआयडीसी पोलिसांच्या अटकेतील संशयिताचे नाव असून महिलेचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
पिडीत महिला ही रामेश्वर कॉलनी परिसरात राहते. तिच्या घराजवळच संशयीत मंगलसिंग जाधव हा राहतो. 30 मार्चच्या रात्री बारा वाजता पिडीत फिर्यादी महिला तिच्या घरात लहान मुलीसह निजलेली होती. त्याचवेळी तिच्या दरवाज्यावर कुणीतरी ठकठक केले. दरम्यान संशयीत लपून बसला. पिडीतेने इमारतीमधील एका भाडेक-यास आपल्या दरवाज्याजवळ कुणी दिसत आहे का अशी विचारणा केली. कुणी दिसत नसल्याचे त्यांनी सांगीतल्यानंतर खात्री करण्यासाठी दरवाजा उघडून महिला बाहेर आली. पिडीत महिलेने आपल्या फिर्यादीत नमुद केलेला संशयीत आरोपी मंगलसिंग जाधव तेथे लपून बसलेला होता. त्याने पिडितेचा डावा हात धरुन तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. या घटनेनंतर आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील लोकांची गर्दी जमल्याचे बघून संशयीत पळून गेला. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपीस पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, सतीश गरजे यांनी ताब्यात घेत अटक केली आहे.