पुणे : पुणे येथील डीटीडीसी कुरिअर कंपनीत पोलिसांनी टाकेलेल्या छाप्यात तलवारींचा साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. 97 तलवारी, 2 कुकरी व 9 म्यान अशा मुद्देमालाचा त्यात समावेश आहे. दिघी येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीचे वितरण केंद्र असून जप्त करण्यात आलेल्या तलवारी औरंगाबाद आणि अहमदनगर येथे जाणार होत्या. औरंगाबाद येथे काही बेरोजगार तरुणांनी तलवारी कुरिअरने मागवून त्या चढ्या भावाने विक्री करण्याचा उद्योग सुरु केला असल्याचे म्हटले जात आहे.
जप्त करण्यात आलेल्या तलवारींचा घातक शस्त्रसाठा पंजाब येथून आल्या होत्या व त्या पुढे औरंगाबाद आणि नगरला जाणार होत्या. उमेश सूद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद), आकाश पाटील (रा. चितली, अहमदनगर) मनिंदर (रा. घंटाघर कॉम्प्लेक्स, अमृतसर, पंजाब) यांच्या विरुद्ध याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी उमेश सूद आणि मनिंदर यांनी अनिल होन व आकाश पाटील यांना कुरिअरच्या माध्यमातून हा घातक शस्त्रसाठा पाठवल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे डीटीडीसी कुरिअर कंपनीत छापेमारी करुन साठा हस्तगत करण्यात आला. अधिक तपास सुरु आहे.