जळगाव : परगावी गेलेल्या कुटूंबाचे घर कुलुपबंद असल्याचा फायदा घेत सुमारे 4 लाख 97 हजार रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी झाली होती. जळगावच्या सिंधी कॉलनीत झालेल्या या घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीतील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच आपली तपासाची चक्रे गतीमान करुन जेरबंद केले आहे. जेरबंद केलेल्या दोघांना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सिंधी कॉलनीतील रहिवासी रोहीत इंद्रकुमार मंधवाणी यांच्या घरात त्यांच्या गैरहजेरीत हा घरफोडीचा प्रकार झाला होता. रोहित मंधवाणी हे आपल्या आतेभावाच्या लग्नानिमीत्त अमरावती येथे सहकुटूंब घराला कुलुप लावून गेले होते. 22 ते 25 एप्रिल दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश मिळवत गुन्हा केला होता. 25 एप्रिल रोजी मंधवाणी आपल्या परिवारासह परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार आढळून आला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त झालेले होते.
त्यावेळी मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला त्यांना आढळून आला. घरातील सामान देखील अस्ताव्यस्त झालेले होते. अडीच लाख रुपये रोख, सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये किमतीची मिक्सरसाठी लागणा-या एकुण चाळीस इलेक्ट्रीक मोटारी, 2100 रुपये किमतीचे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे एकुण 60 ग्रॅम चांदीचे सहा शिक्के असा एकुण 4 लाख 97 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे आढळून आले. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी समांतर तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या टीमवर सोपवली.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार समीर हनीफ काकर (रा. बिसमील्ला चौक तांबापुर जळगाव) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची खात्रीशीर माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पुढील तपासकामी त्यांनी आपले सहकारी पोलीस उप निरीक्षक अमोल देवडे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, पोना नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील चापोकॉ. प्रमोद ठाकुर आदींचे एक पथक तयार केले.
आरोपीतांचा शोध घेत असतांना समीर हनीफ काकर हा जळगाव शहरातील बिसमिल्ला चौक, तांबापुरा परीसरात फिरत असल्याची माहिती तपास पथकास समजली. माहिती मिळताच पथकाने तांबापुरा बिसमील्ला चौकातून झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबुल करत अन्सार शहा रुबाब शहा या आपल्या साथीदाराचे नाव पुढे आणले. दोघंनी मिळून सदर घरफोडीचा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. दोघे आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे.