धुळे : दहा ते पंधरा टक्के व्याजासाठी धुळे येथील तरुणाचे अपहरण व मारहाण प्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी बबन थोरात यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. याशिवाय कोट्यावधी किंमत असलेले घर अवघ्या 10 ते 15 लाख रुपये किमतीत देण्यासाठी तगादा लावल्याचा देखील तरुणाने आरोप केला आहे. चौघांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आली आहे.
मिनेश माहेश्वर बोडस (43) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार आबा वाणी उर्फ प्रमोद काशीनाथ वाणी (रा. वलवाडी ), जितेंद्र बाबूराव वाघ (रा. माधवपुरा ), नीलेश हरळ (रा. अभय कॉलेज जवळ ), नितीन उर्फ बबन मधुकर थोरात (रा. मनमाड जीन, पारोळा रोड धुळे) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. संशयीतांकडून फिर्यादी मिनेश बोडस या तरुणाने दरमहा दहा ते पंधरा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. सर्व परतफेड केल्यानंतर देखील पैशांची मागणी तसेच करोडो किमतीचे घर दहा ते पंधरा लाख रुपयात मागणी केली जात असल्याचे मिनेश बोडस या तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला शिवीगाळ व मारहाण केल्याने डाव्या कानाचा पडदा फाटला व कान बधीर झाल्याचे बोडस याने म्हटले आहे. आझाद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलिस उप निरीक्षक हर्षवर्धन बहिर पुढील तपास करत आहेत.