नाशिक – येवला : कुसूर येथे जमिनीच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत शेतकरी चाळीस टक्के भाजला असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. दिलीप शेषराव गायकवाड असे जळीत शेतक-याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस स्टेशनला तेरा संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना 9 मे पर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
शेतातील जमिनीचा बांध फोडून सुमारे तीस फुट जमीन संशयितांनी नांगरली होती. याबाबत गायकवाड हे संशयितांना समजावून सांगण्यासाठी गेले होते. संशयितांनी गायकवाड यांच्यावर दादागिरी केली. दरम्यान संग्राम मेंगाळ व राहुल हिंगे या दोघांनी पाण्याच्या बाटलीतून डिझेल आणून गायकवाड यांच्या अंगावर ओतले. मेंगाळ यांनी काडी पेटवून गायकवाड यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. संग्राम मेंगाळ, राहुल हिंगे, मोनाली हिंगे, दीपक हिंगे, नीलेश हिंगे, रामदास मेंगाळ, सुमनबाई मेंगाळ, भागिनाथ हिंगे, किरण हिंगे, नवनाथ मेंगाळ, मथुराबाई हिंगे, दिलीप हिंगे, सर्जेराव हिंगे, रवींद्र नवले अशा एकुण तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. स.पो.नि. एकनाथ भिसे पुढील तपास करत आहेत.