नाशिक : वडाळा येथील रहिवासी असलेला सराईत गुन्हेगार मुजाहिद उर्फ गोल्डन अफजल खान (23) याची हत्या आर्थिक वादातून झाली असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या गुन्ह्याच्या तपासात नाशिक ग्रामीण पोलिसांनी रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे (30), रा. स्नेह संकुल, अशोका मार्ग, नाशिक, सलमान उर्फ माम्या वजीर खान (रा. वडाळागाव, नाशिक), सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड (रा. वडाळागाव, म्हाडा कॉलनी, नाशिक) अशा तिघांना अटक केली असून एक फरार आहे.
घोटी पोलिस स्टेशन हद्दीत 24 एप्रिल रोजी वैतरणा धरणाच्या बॅक वॉटर परिसरात एका तरुणाचा जळीत अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घोटी पोलिस स्टेशनला या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार वडाळा येथील राहणारा गुन्हेगार मयत गोल्डी व त्याचे इतर साथीदार घटनेच्या दिवशी वैतरणा धरणावर पार्टी करण्यासाठी गेले होते. तेथे झालेल्या आर्थिक वादातून इतर साथीदारांनी त्याचा गळा चिरुन खून केला. अटकेतील आरोपी हे पोलिसांच्या अभिलेख्यावरील नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, जबरी चोरी, घरफोडी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. मयत गोल्डीविरुद्ध देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.