जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वार्डात धुमाकुळ घालणा-या बंदींसह त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. पो.हे.कॉ. संदीप पंडीतराव ठाकरे, पो.कॉ. पारस नरेंद्र बाविस्कर, पो.कॉ. किरण अशोक कोळी, पो.कॉ. राजेश पुरुषोत्तम कोळी अशी निलंबीत करण्यात आलेल्या मुख्यालयीन पोलिस कर्मचा-यांची नावे आहेत. बंदी आरोपी सतिष मिलींद गायकवाड व त्याचे इतर मित्र आणी नातेवाईक अशांविरुद्ध पो.कॉ.राजेश पुरुषोत्तम कोळी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कैदी वार्डात 8 मे रोजी रात्री साडे नऊ वाजता फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. आरोपी सतिष गायकवाड व बंदी आरोपी यांचे आपसात जोरजोरात भांडण सुरु होते. त्यांच्यातील भांडणामुळे इतर रुग्णांना त्रास सुरु झाला होता. भांडण करणा-यांना शांत करण्यासाठी मुख्यालयीन पोलिस कर्मचारी पो.कॉ. राजेश कोळी हे चावीने दरवाजा उघडून आत गेले. त्यावेळी आरोपी सतिष गायकवाड याने पोलिस कर्मचारी राजेश कोळी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तु आमच्या वादात पडू नको नाहीतर चाकूने तुझा मर्डर करुन टाकेन अशी धमकी सतीष गायकवाड याने फिर्यादी पोलिस कर्मचा-याला दिली.
पोलिस कर्मचारी कोळी यांना दरवाजाकडे लोटून दिल्याने वातावरण तंग झाले होते. धास्तावलेले इतर रुग्ण आणि रुग्णालयीन कर्मचारी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळाले होते. या घटनेची पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गांभिर्याने दखल घेतली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता करत आहेत.