जळगावच्या कोरोना योद्ध्याने लिहिले देशातील कोरोना योद्ध्यांच्या वेदनेचे पाहिले पुस्तक

"मृत्यू घराचा पहारा"

विनोद अहिरे यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर

विनोद अहिरे

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातील मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे गेल्या तीन महिन्यापासून कोरोना कक्षात ड्युटी करत आहेत. दि. 21/4/2020 रोजी अहिरे यांची प्रथमच कोरोना कक्षात ड्युटी लावण्यात आली. त्यावेळी कोरोनाची जनमानसात प्रचंड दहशत होती. त्यात पोलीस दल देखील अपवाद नव्हते. त्यामुळे विनोद अहिरे देखील आपल्या कुटुंबीयांच्या काळजीने प्रचंड तणावाखाली झाले होते. आपले अनुभव कथन करतांना त्यांनी म्हटले की माझ्या अठरा वर्षाच्या नोकरीत आतापर्यंत ड्युटी करण्याची एवढी भिती कधीच वाटली नव्हती.

यापुर्वी अनेक जोखमीच्या ठिकाणी, दंगलीत जिवाची पर्वा न करता अहिरे यांनी कर्तव्य पार पाडले आहे. यापुर्वी दंगलीत अथवा जोखमीच्या ड्युटीत जखमी झाल्यास अथवा जिव गेल्यास ते स्वत:पुरता मर्यादित होते. मात्र कोरोना कक्षातील ड्युटीचे तसे नव्हते. हा आपला एकट्याचा धोका नसून आपल्यासह परिवाराचा देखील धोका होता. आपल्याला कोरोनाची लागण झाल्यास आपल्या परिवाराला देखील लागण होण्याची भिती विनोद अहिरे यांना सतावत होती. कोरोनामुळे होणा-या मृत्यूच्या कल्पनेने पोलिस नाईक विनोद अहिरे सुरुवातीला भेदरून गेले होते. असे असले तरी त्यांच्यासाठी देश आणि कर्तव्य महत्त्वाचे होते.

कोरोणा कक्षात ड्युटी करताना निर्माण झालेल्या भावभावना शब्दबद्ध करत त्यांनी 22/4/ 2020 रोजी फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. त्या पोस्टला त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी फोन करुन त्यांचे कौतुक केले. कोरोना कक्षात ड्युटी करतांना आलेल्या अनुभवाबद्दल आपले एखादे पुस्तक लिहिण्याचे त्यांना सांगण्यात आले.

याच प्रेरणेतून पोलिस नाईक विनोद अहिरे यांनी कोरोना कक्षात ड्युटी करतांना आलेल्या अनुभवावर आधारीत पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. “मृत्यू घराचा पहारा” हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आता तयार असून प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 

सदर पुस्तकाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी प्रस्तावना दिली आहे. पोलीस अधीक्षक जळगाव व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी पुस्तकाला लेखी  स्वरूपात शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पोलिस नाईक विनोद अहिरे यांना पोलिस दलात दाखल करुन घेणारे जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रवीण साळुंके तसेच कोरोना महामारीत जिवाची बाजी लावणा-या सर्व कोरोना योद्ध्यांना हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी विनोद अहिरे लिखीत पुस्तकाला अर्थसहाय्य केले आहे सदर पुस्तकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील “मुख्यमंत्री हे जनतेचे पालक” या शीर्षकाखाली लेख लिहिण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पोलिस नाईक विनोद अहिरे यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here