नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत एलसीबीत पोलिस अंमलदारांची नियुक्ती होण्यासाठी पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार अटी शर्थीं पुर्ण करणा-या अंमलदारांना एलसीबीत नियुक्ती देण्याचे आदेश काढले आहेत.
यापुर्वी देखील पोलिस महासंचालकांनी एलसीबीत अंमलदारांच्या नियुक्तीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण केलेला असावा. असे असतानाही ज्यांना गुन्हे उघडकीस आणण्याचा अनुभव नाही, अशांची नेमणूक केली जात असल्याचे दिसून आले असल्याचे म्हटले जात आहे.
कमीत कमी दोन पोलिस स्टेशन मिळून सहा वर्ष कर्तव्य बजावले असावे. स्वतंत्रपणे गुन्हे उघड केलेले असावेत. मागील दहा वर्षांत अंमलदारास कोणतीही मोठी शिक्षा झालेली नसावी. गुन्हे शोधावर 75 गुणांची चाचणी घेण्यात यावी. त्यात 40 गुण वैकल्पिक (ऑब्जेक्टीव्ह) आणि 35 गुणांची प्रॅक्टीकल परीक्षा घेण्यात यावी. मेरिट लिस्टनुसार एलसीबीत नेमणूक करावी. त्यांचा सविस्तर तपशील नाशिक कार्यालयास लेखी स्वरुपात सादर करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश बी. जी. शेखर यांच्याकडून देण्यात आले आहेत. अधिकारी-कर्मचारी यांचे दहा वर्षांमध्ये अॅव्हरेज ग्रेडींग ‘बी प्लस’च्या खाली नसावे असेही सांगण्यात आले आहे.