कंत्राटदारास ब्लॅकलिस्टमधे टाकण्याची गुप्ता यांची मागणी

जळगाव : जळगाव शहरातून औरंगाबादकडे जाणा-या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. या रस्त्याचे काम करणा-या कंत्राटदारास आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंत्राटदार एजन्सीमार्फत सुरु असलेल्या संथ गतीच्या कामामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. या कंत्राटदार एजन्सीस ब्लॅक लिस्टमधे टाकण्याची मागणी आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग उप विभाग, नवापूर (जळगाव) या उपविभागाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद ते जळगांव राष्ट्रीय महामार्ग क्रं. 753F किमी 87+700 ते 89+800 व किमी 144+750 ते 147380 या रस्त्याचे काम सुरु आहे. जळगाव शहरातील लांबी किमी 144750 ते किमी 147380 दरम्यान आहे. सदर रस्ता हा जळगाव विमानतळास जाण्याचा प्रमुख मार्ग असून जागतिक वारसा स्थळ असलेली अजिंठा लेणी तसेच औरंगाबाद कडे जाणा-या वाहतुकदारांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. जळगाव शहर एमआयडीसी व रेमंड, सुप्रीम सारख्या नामांकीत कंपन्या देखील याच रस्त्यावर आहेत. या मार्गावर अवजड वाहतुक कायम सुरु असते.

विमानतळावर जाण्याचा हा प्रमुख एकमेव मार्ग असल्यामुळे जळगाव शहराला भेट देणारे मंत्री व त्यांचे दौरे, सामाजिक, राजकिय तथा प्रशासकिय व्यक्तींची याच रस्त्याने वर्दळ सुरु असते. असे असतांना देखील मक्तेदार कंपनी इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड मार्फत सदर काम संथ गतीने सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा 22 एप्रिल 2022 रोजी जळगाव दौरा होता. या दौ-या दरम्यान स्थानिक नागरीकांनी अजिंठा चौफुली येथे धरणे आंदोलन केले होते. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागून तो वाहतुकीसाठी योग्य रितीने खुला करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे. सदर कंत्राटदारास ब्लॅक लिस्ट मधे टाकाण्याची मागणी देखील गुप्ता यांच्याकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here