जळगाव : किरकोळ कारणावरुन पहुर येथील तरुणावर चाकूहल्ला करणा-या दोघा तरुणांची गावात धिंड काढण्यात आली. या घटनेत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या अंडी व्यावसायिकावर देखील चाकू हल्ला करण्यात आला होता. दोघा जखमींवर पहुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकू हल्ला करुन दहशत माजवणा-या चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली.
रविवारी रात्री नऊच्या सुमारास सतीष कडुबा पांढरे (35) हा तरुण नाना आम्लेट सेंटरवर गेला होता. यावेळी सूरत येथील तडीपार गुंड शुभम उर्फ टायगर उर्फ झिपऱ्या रमेश पाटील, त्याचा मावस भाऊ रोहित उर्फ चिक्या पाटील, त्यांचा मामा बंडू एकनाथ पाटील व एक अज्ञात संशयित असे चौघे जण देखील त्याठिकाणी आले. त्यावेळी संशयित चिक्याने त्याच्याकडील चाकूने सतीश पांढरे याच्या पोटात वार केले. बंडू व एकाने (नाव माहित नाही) संशयित सतिशला पकडून ठेवले. आमलेट सेंटरचालक राहुल भोंडे वाद मिटवण्यासाठी गेला असता संशयित शुभम उर्फ टायगरने त्याच्याही पाठीवर चाकूने वार केले. या घटनेनंतर चौघांनी पलायन केले.
पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी माहिती समजताच तातडीने आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. सतीश पांढरे याचा भाऊ विलास पांढरे याच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा फरार तरुणांचा शोध सुरु आहे.