औरंगाबाद : रेल्वे रुळ ओलांडत असतांना पाय अडकून ट्रॅकवर पडलेल्या महिलेचे प्राण गाडी अंगावरुन गेल्यानंतर देखील दैव बलवत्तर असल्यामुळे वाचले. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेच्या साक्षीदारांचे श्वाव काही क्षणासाठी रोखले गेले. सुनिता गाडेकर असे या महिलेचे नाव आहे.
मुकुंदवाडी स्थानकात रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना एका महिलेचा पाय अचानक अडकला. त्याचवेळी समोरुन या स्थानकावर थांबा नसलेली जनशताब्दी एक्सप्रेस भरधाव वेगाने अवघ्या पाचशे मिटर अंतरावर येवून ठेपली होती. आता उठून रुळ ओलांडणे महिलेस शक्य नव्हते. आजुबाजूच्या लोकांनी त्या महिलेला सरळ झोपून राहण्यास जोरात ओरडून सांगितले. प्रसंगावधान राखत देवाचे नामस्मरण करत महिला दोन्ही रुळांच्या मधे सरळ झोपून राहीली. दरम्यान गाडीचा वेग ताशी शंभरचा असल्यामुळे चालकाला गाडी थांबवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने जोरात हॉर्न वाजवत गाडी पुढे नेली. गाडी पुढे गेल्यावर इतर प्रवाशांनी महिलेला सुखरुप बाहेर काढले. या रेल्वे स्थानकाच्या पलीकडे काही रहिवासी वसाहती आहेत. या वसाहतीमधील लोक रुळ ओलांडून ये जा करत असतात. जीव वाचण्याची शक्यता सोडून देवाचे नामस्मरण करत देवाच्या भरवशावर आपण निपचीप पडून राहिल्याचे प्राण वाचलेल्या सुनिता गाडेकर यांनी म्हटले.