मटका किंग जिग्नेश ठक्कर खूनातील शुटर पोलिसांच्या तावडीत

मटका किंग जिग्नेश ठक्कर

ठाणे :  गेल्या शुक्रवारी मटका किंग जिग्नेश ठक्कर याची हत्या झाली होती. त्याच्या मारेक-याला गुजरात येथून अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाने यश मिळवले आहे. आरोपीस अटक करणा-या पथकाला ठाणे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

जयपाल दुलगज उर्फ जपान असे अटकेतील शुटरचे नाव आहे. मटका किंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज उर्फ जपान या शुटरला  अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मटका किंग जिग्नेश ठक्कर याची शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

 कामकाज आटोपून घरी परत जाणा-या जिग्नेश ठक्करवर पाच गोळ्या झाडण्यत आल्या होत्या. जिग्नेश ठक्कर याचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात पत्त्यांचे क्लब आहे. क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणून देखील जिग्नेश काम करत होता. त्याचा लहानपणीचा मित्र धर्मेश उर्फ ननू शहा हा या धंद्यात त्याचा साथीदार होता. गुंड वृत्तीच्या धर्मेशचे व्यवसायातील पैशावरून जिग्नेश सोबत वाद झाला होता.

त्या वादातून दोघा मित्रांमध्ये कट्टर शत्रुत्व निर्माण झाले होते. धर्मेशचा मित्र चेतन पटेल व जिग्नेश यांच्यात 29 जुलै रोजी झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला होता. यावेळी धर्मेशने जिग्नेशचा काटा काढण्याचे नियोजन केले होते. आपला दबदबा राहण्यासाठी धर्मेशने जिग्नेश यास संपवण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर दोघा-तिघा साथीदारांच्या मदतीने शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्टेशन नजिकच्या सुयश प्लाझा बिल्डिंग आवारात जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याचा खून केला होता.

या गुन्हयाचा समांतर तपास ठाणे एलसीबीच्या खंडणी विरोधी पथकाकडून सुरु होता. या गुन्हयातील आरोपी जयपाल हा गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला समजली होती. या माहितीच्या बळावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मुख्य सुत्रधारापैकी एक जयपाल उर्फ जपान यास अहमदाबादला अटक केली. पुढील कारवाईसाठी खंडणी विरोधी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here