तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध गुन्हा

सातारा (नागठाणे) संजय कांबळे याजकडून : पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकास मारहाण करुन आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बोरगाव येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रमेश शेडगे (22) रा.बोरगांव ता.सातारा असे आत्महत्या केलेल्या मयत तरुणाचे नाव आहे. सोमनाथ रामचंद्र कोळेकर, रामचंद्र शंकर कोळेकर, कृष्णा रामचंद्र कोळेकर आणि अभिजित रमेश नलावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

समीर सुरेश शेडगे यांनी याप्रकरणी बोरगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी समीर शेडगे याचा चुलत भाऊ सागर शेडगे याने 1 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बोरगाव येथील शेती शाळेनजीक मुहीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली.

मयत सागर शेडगे याचे आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा सोमनाथ कोळेकर यास संशय होता. त्या संशयातून तो सागर यास मारहाणीची धमकी देत होता. त्याबाबत मयत सागर याने फिर्यादी समीर शेडगे यास मृत्युपुर्वी कथन केले होते. त्याला समजावण्यासाठी सागरने समीर यास गळ घातली होती. सोमनाथ यास आपण समजावले असून तु काळजी करु नको असा दिलासा समीरने सागर यास दिला होता. त्यानंतर 1 जून रोजी समीर पुणे येथून गावी आला. त्यानंतर सागर याचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मयत सागरचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याच्या कारणावरुन सागर यास सोमनाथसह त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. सागर वाघ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here