मोबाईल तपासल्याने पतीने केली पत्नीची हत्या

बीड :  आपल्या गैरहजेरीत पत्नीने मोबाईल तपासल्याचा राग आल्याने पतीने तिची हत्या केल्याची घटना बीड नजीक रंजेगाव येथे उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पती दिनेश आबुज यास अटक केली आहे. ज्योती दिनेश आबुज (30) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

पती दिनेश याच्यावर त्याची पत्नी ज्योती हिचा संशय होता. तो सतत मोबाइलवर कुणाशी तरी बोलत असल्यामुळे त्याच्यावरील तिचा संशय गडद झाला होता. शनिवारी रात्री तिने त्याचा मोबाईल तपासला. आपल्याला न विचारता आपला मोबाईल तपासल्यामुळे त्याला पत्नीवर राग आला. त्यामुळे झालेल्या कडाकाच्या वादानंतर त्याने दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने स्वत:चे हातपाय दोरीने बांधून घेत त्यात एक लाकडी दांडा टाकला. या दांड्याने गेट वाजवून त्याने परिसरातील लोकांना जागे केले. चोरांनी आपले  हातपाय बांधून पत्नीची हत्या केल्याचा त्याने बनाव केला. मात्र त्याचा हा बनाव पोलिसांपुढे फिका पडला. अखेर त्याने आपला गुन्हा कबुल केला. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पती दिनेश आबुज याच्याविरोधात पिंपळनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला  आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस उप अधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. बाळासाहेब आघाव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे आदींनी घटनास्थळी भेट दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here