जम्मू : पबजी गेमची लोकप्रियता वाढत असली तरी हा खेळ जिवघेणा ठरत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. अनेक मुले हा खेळ तासनतास खेळत असतात. या खेळामुळे अनेक मुलांना वेड लागले आहे. या वेडातूनच विविध घटना घडत असतात.
पबजीच्या खेळातून एका व्यक्तीचा तिघांकडून खून झाल्याची घटना घडली आहे. जम्मू येथील आर. एस. पुरामधील बड्याल काझीयन गावात ही घटना घडली आहे. पबजी खेळताना आवाज कमी करा असे सांगितले म्हणून तिघांनी मिळून एकाचा खून केला.
राज कुमार, बिकराम जीत आणि रोहित कुमार हे तिघे पबजी हा खेळ खेळत होते. त्यावेळी त्यांना दलीप राज यांनी तेथे येवून खेळाचा आवाज कमी करण्यास सांगितले. आवाज कमी करण्याच्या कारणावरुन दलीप राज आणि तिघांमध्ये वादाची ठिणगी पडली. आम्ही गेम खेळत असताना आमचे लक्ष विचलित का केले असा प्रश्न तिघांनी दलीप राज यांना केला. हा वाद काही वेळ आटोपला मात्र राग मनात धरुन तिघांनी राज यांच्यावर एका ओंडक्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात दलीप राज अतिशय गंभीर जखमी झाले. त्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पबजीची लोकप्रियता वाढत असली तरी ती जिवघेणी लोकप्रियता आहे. या खेळाचे अनेकांना व्यसन जडले आहे. या व्यसनातून अनेक जिव गेले आहेत.