आपल्या भारत देशात लोकशाही राज्यपद्धती स्वीकारण्यात आली आहे. जगातील मोठी लोकशाही इथे सुखाने नांदते असे म्हणतात. पण हे तितकसं खरं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीच महिन्यात स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन पंतप्रधानांच्या हत्या झाल्या. काँग्रेसच्या प्रभावाखाली सुरु झालेली देशाची वाटचाल आता भाजपच्या प्रभावाखाली आल्याचे म्हटले जाते. आता श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्यासारखे सशक्त पंतप्रधान देशाला दोन वेळा लाभले. आता पुन्हा तिसऱ्यांदा या महत्त्वाच्या पदावर आरुढ होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते. भाजपातूनही त्यांना तसे समर्थन दिसते. म्हणजे सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची तिसरी इनिंग कदाचीत सुरु होईल.
आता पुढच्या महिन्यात आपले राष्ट्रपती कोविंद यांचा सेवा कार्यकाळ संपत आहे. राज्यसभेच्या नुकत्याच झालेल्या सहा जागांच्या निवडणूकीत भाजप विरुद्ध विरोधक असा सामना देशाने पाहिला. लागलीच देशाच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. भारताचे महामहीम राष्ट्रपती हे सर्वोच्च मानाचे सन्मानाचे – आदराचे पद आहे. या पदावर सर्वमान्य नेते यांची बिनविरोध निवड व्हावी असे म्हणण्यासाठी ठीक असते. पण मागील काळात माजी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार माननीय सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या निवडणुकीच्या वेळी ज्याप्रकारे डावपेच रंगले, ते लक्षात घेता कोणतीही निवडणूक आली म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक लढतातच. साठी प्रसंगी उणे दुणे उकरुन काढली जातात. त्यावेळी महाराष्ट्राच्या प्रतिभाताई यांना राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. महाराष्ट्राच्या कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेता दिल्लीच्या केंद्रस्थानी मोठ्या पदावर विराजमान होत असेल तर त्यांना असाच भरघोस पाठिंबा देणे महाराष्ट्रीयनांचे आद्यकर्तव्य म्हटले पाहिजे. आताशा महाराष्ट्रातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदराव पवार यांचे नाव गैरभाजपेतर आघाडीतून पुढे आल्याचे म्हटले जाते. त्यासाठी भाजपात बिनविरोध राष्ट्रपती निवडून देऊ नका असा तर्क दिला जातोय. माननीय शरदराव पवार यांनी राष्ट्रपती पद भुषवण्यासाठी अद्याप होकार दिलेला नाही.
खरंतर राष्ट्रपतीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे चाणाक्ष व्यक्तिमत्व. अत्यंत कुशलतेने ते अचानक सुयोग्य नेत्याचा शोध घेऊन त्यांना कसे जनतेपुढे आणतात ते गेल्या महिन्यापासून सांगितले जात आहे. गेल्या वेळी त्यांनी कोविंद साहेबांचं नाव पुढे आणून साऱ्यांना धक्का दिला होता. भारताच्या उत्तर-पूर्व भागात बिहार, उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांसाठी हा दलित सर्वोत्तम चेहरा पुढे आणल्याचं तेव्हा म्हटले गेले. आता गुजरातसह आणखी दहा राज्यात निवडणुका आहेत आणि सन 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आहे. हे बघता श्रीमान मोदीजी राष्ट्रपतीपदावर कुणाला विराजमान करु इच्छितात हे बघणे महत्त्वाचे ठरेल. स्वतः मोदीजींनी त्यांचे पत्ते राखून ठेवले आहेत. नितीश कुमार, शरद पवार यांच्या मनाचा थांगपत्ता घेण्याचा डाव टाकल्याचे दिसते. दोघांचा नकार दिसतो पण त्या नकारात किती दम आहे हेही पाहिले जाणारच आहे.
भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीत पंतप्रधानपद सर्वाधिक शक्तिशाली आहे. राष्ट्रपतीपद सन्मानाचे पण दोघा पदांच्या अधिकार कक्षा लक्षात घेता पंतप्रधान हे राष्ट्रपती महोदयांचा सन्मान करतातच आणि राष्ट्रपती महोदय पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार अर्थात मत जाणून घेऊनच त्यांच्या कार्याची दिशा ठरवतात. भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती ही दोन्ही सन्मानाची उच्च अधिकाराची पदे आहेत. त्यांचा सन्मान ठेवायलाच हवा. परंतु भारताचा राष्ट्रपती हा नेहमीच पंतप्रधानांच्या होकारात स्वतःचा होकार मिसळतो असे म्हटले जाते. पंतप्रधानांनी एखाद्या विषयाबाबत व्यक्त केलेल्या मताशी अथवा कृतीशी विरुद्ध किंवा पंतप्रधानांची भूमिका अमान्य करणारा निर्णय देऊ शकत नाही असा दाखला दिला जातो. पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व निर्णयांना राष्ट्रपतींची संमती असतेच असते.
या दोन्ही मान्यवरांच्या अधिकार कक्षा पाहता काही विद्वानांनी राष्ट्रपती हा केवळ सरकारचा रबर स्टॅम्प असतो असे विधान केलेले आढळते. देशाच्या वाटचालीत एखादा निर्णय जनतेच्या लोकशाही हक्कांविरुद्ध येत असेल तर राष्ट्रपती त्यात हस्तक्षेप करुन एखादे विधेयक निर्णय थांबवण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत. पण ते वापरले जात नाही. त्यासाठी राष्ट्रपतीपदावर विराजित केलेली स्थानमूर्ती मवाळ स्वभाव, प्रकृतीची आणि आपल्या विचारधारेची असावी असा शोध घेतला जातो. थोडक्यात बंडखोर प्रवृत्ती नसावी. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता माननीय शरद पवार यांना पॉवरफुल पंतप्रधानपदी विराजमान व्हावेसे वाटते की रबर स्टॅंप म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रपतीपदी जायचे? असा जनमतातला प्रश्न विचारावासा वाटतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे दोघे अत्यंत चतुराईने त्यांच्या राजकीय मार्गातील अडथळे दूर करत चालले आहेत. राष्ट्रपती पद हा शरद पवार यांच्यासाठी सापळा ठरु शकतो. शरद पवार यांना राज्याच्या, केंद्राच्या सक्रीय राजकारणातून बाजूला सारण्यासाठी ही खेळी अनेक राजकीय नेत्यांना उपयुक्त ठरु शकते. पंतप्रधान पदाचा जुना इतिहास लक्षात घेता अशी महत्वकांक्षा व्यक्त केलेल्या मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, अटल बिहारी वाजपेयी, विश्वनाथ प्रताप सिंग, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली. यापैकी आय. के. गुजराल, मनमोहन सिंग, देवेगौडा यांना अचानक लॉटरी लागली असे म्हटले गेले. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या परिस्थितीजन्य संधीची प्रतीक्षा करायची की सर्वोच्च सन्मानाचे शांततामय निवृत्ती जीवन स्वीकारायचे? याचा निर्णय कसा होतो त्यासाठी प्रतीक्षा.