जळगाव : पत्नीच्या मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी असलेल्या पोलिस कर्मचारी पतीसह पाच जणांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मयत महिलेची परभणी येथील नणंदेस अद्याप अटक होवू शकलेली नाही.
जळगावच्या रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या आशाबाबा नगरातील रहिवासी सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा दहा जुलै रोजी जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयत – जळीत महिलेचा पोलिस कर्मचारी पती नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) या सर्व जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदर गुन्हा १३ जुलै रोजी दाखल करण्यात आला होता. तपासाअंती नंतर या गुन्हयात खुन व हुंडाबळीचे देखील कलम वाढवण्यात आले होते.
या प्रकरणातील नणंद सरला देशमुख वगळता इतर पाच संशयीतांना रामानंद नगर पोलिस पथकाने अटक केली आहे. काही दिवसांपुर्वी जळगाव सत्र न्यायालयाने चार जणांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. अखेर पाच जण पोलिसांना शरण आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे सेवारत असलेला कर्मचारी नरेंद्र सोनवणे यास काही दिवसांपुर्वी पोलिस अधिक्षकांनी निलंबीत केले आहे.