जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत शिव कॉलनी परिसरातील स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे एटीएम फोडण्याची घटना 12 जुलै रोजी घडली होती. या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या एटीएम मधून 14 लाख 41 हजार 500 रुपये लुटून नेण्यात आले होते.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अकबर पटेल व त्यांचे डीबी पथकातील कर्मचारी या गुन्हयाचा तपास करत होते.
हरीयाणा राज्यातील फरिदाबाद-सोपान पोलिस स्टेशन हद्दीत अशाच पद्धतीने एटीएम फोडून रोख रकमेची चोरी करणारे दोघे पकडण्यात आल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना समजली. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पेठ पोलिस हरियाणा राज्यातील पोलिसांच्या संपर्कात होते. तातडीने हरियाणा पोलिसांच्या ताब्यातील दोघा आरोपींना ट्रांझिट वॉरंटद्वारे ताब्यात घेण्यात आले.
या घटनेत एकुण तिन जण आरोपी आहेत. त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. इकबाल व इसाक असे अटकेतील दोघांची नावे असून यातील फरार खुर्शीद मदारी हा अट्टल गुन्हेगार असल्याचे पो.नि. अकबर पटेल यांनी सांगितले आहे.