नाशिक : पहिले लग्न झाले असतांना ते लपवून दुसरे लग्न करणा-या नाशिकच्या तरुणाविरुद्ध अकोला न्यायालयाच्या आदेशाने मुंबई नाका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरे लग्न करणा-या तरुणाविरुद्ध अगोदरच विवाहीत असतांना बळजबरी शरीरसंबंध ठेवल्याचा तर सासु सास-यांनी त्यांचा मुलगा अगोदरच विवाहीत असल्याचे लपवल्याबद्दल फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने 30 जानेवारी 2020 याप्रकरणी अकोला न्यायालयात पतीसह सासु सास-यांविरुद्ध अकोला न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून पिडीतेची नाशिकच्या विनोद ढाकणे या तरुणासोबत ओळख झाली होती. केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेली ओळख नाशिकच्या विनोदने पिडीतेसोबत मोठ्या प्रमाणात वाढवली. संशयित पतीची आई विजया व वडील वसंतराव ढाकणे यांनी विनोदचा घटस्फोट झाल्याचे पिडितेच्या नातेवाइकांना खोटे सांगत लग्न जमवले. मात्र लग्न झाल्यानंतर पतीचा घटस्फोट झाला नसून तो अगोदरच विवाहीत असल्याचे पिडीतेला समजले. पहिल्या पत्नीची कायदेशीर फारकत झालेली नसताना पतीने बळजबरी लग्न करत शरीर संबंध ठेवल्याची तक्रार अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानंतर पीडितेने अकोला न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने मुंबईनाका पोलिसांना सदर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनिल रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.