सोलापूर : पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्ज व्हेरीफिकेशन व पत्ता पडताळणीकामी जेल रोड पोलिस स्टेशनमधील सहायक फौजदाराने संबंधीत अर्जदाराकाडे पंधराशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. चौकशीअंती सदर बाब उघड झाल्यानंतर सहायक फौजदारासह त्याच्या साथीदाराविरुद्ध जेलरोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र गणपत शिंदे (57) आणि त्यांचा साथीदार सलाउद्दीन लायकअली मुल्ला (46) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. सलाऊद्दीन मुल्ला हे ट्रॅव्हल्स एजन्सी चालवतात.
पासपोर्ट मिळण्याकामी तक्रारदाराने ऑनलाईन अर्ज केला होता. त्याकामी अर्ज व्हेरिफिकेशन आणि पत्ता पडताळणी करुन मिळण्याकामी तक्रारदाराचा पाठपुरावा सुरु होता. मात्र सहायक फौजदार शिंदे यांनी तक्रारदाराकडे पंधराशे रुपयांची लाच मुल्लाच्या फोन पे खात्यावर लाचेच्या रुपात टाकण्यास सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा व पडताळणी केल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, यांच्यासह घुगे, घाडगे, जानराव, किणगी, सोनवणे सणक्के, पकाले, सुरवसे आदींनी या तपासकामात सहभाग घेतला.