जळगाव : ‘गुलाबी रिक्षा चालवून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. कष्टकरी, गोरगरीब महिलांना ऑटो रिक्षा घेण्यासाठी लागणारी अग्रीम रक्कम देऊन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने त्यांचा जीवनमार्ग सोपा केला व त्यांच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.’ पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या १५ सदस्यांना रिक्षा घेण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने अग्रीम रक्कमेसाठी आर्थिक सहाय्य केले. त्याचा छोटेखानी कार्यक्रम गांधी तीर्थला आज २८ रोजी पार पडला. त्यासाठी सौ. ज्योती जैन,गीता धरमपाल,सौ. अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅंड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, कुशल ऑटोमोबाईल चे विद्याधर नेमाने मराठी प्रतिष्ठान चे विश्वस्त सौ संध्या वाणी, सौ निलोफर देशपांडे डॉ सविता नंदनवार उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरात महिला, मुलींच्या सुरक्षीत प्रवासासाठी महिला ऑटोचालक असाव्या असा विचार पुढे आला. त्यासाठी मराठी प्रतिष्ठान तर्फे तीन वर्षां पूर्वी पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी शहरात पिंक ऑटो गटाची स्थापना करण्यात आली. १५ महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी कुशल ऑटोचे संचालक विद्याधर नेमाने यांनी सौजन्य केले. या सर्व महिलांचा जळगाव जनता बँकेत बचत गट असून त्या मार्फत सिंधु भरारी या योजनेअंतर्गत त्यांना रिक्षा घेण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा घेणाऱ्या त्या महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी अडचण होती .या बाबत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी डाऊन पेमेंटसाठी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड जमील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वाणी यांनी केले.