जळगाव : किनगाव ता. यावल येथील वृद्ध महिलेची हत्या करणारा संशयित आरोपी एलसीबी पथकाने निष्पन्न केला आहे. अटकेतील आरोपीने यापुर्वी गेल्या वर्षी अशाच पद्धतीने दोन वृद्ध महिलांच्या हत्या केल्याचे देखील कबुल केले आहे. मुकुंदा ऊर्फ बाळु बाबुलाल लोहार (30) रा. चौधरीवाडा किनगाव ता. यावल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सदर माहिती दिली आहे.
23 मे 2022 रोजी किनगाव येथील रामराव नगर परिसरात राहणा-या मराबाई सखाराम कोळी (70) या वृद्ध महिलेची हत्या झाली होती. वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरी करण्यासाठी रुमालाने गळा आवळून संशयीत आरोपी मुकुंदा लोहार याने वृद्ध महिलेची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला या घटनेप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गु.र.न. 235/2022 भा.द.वि. 392, 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वृद्ध महिला गळा आवळल्याने बेशुद्ध झाली होती. परिसरातील लोकांनी तिला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. त्यामुळे या गुन्ह्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि. 302 397 हे वाढीव कलम लावण्यात आले होते.
सदर वृध्द महिला मराबाई कोळी ही घटनेपुर्वी साधारण सहा ते सात महिन्यापुर्वी रेशनचा सामान घेण्यासाठी दुकानावर आली होती. त्यावेळी रेशन जास्त असल्यामुळे वृद्ध महिलेस मदत करण्याच्या निमीत्ताने संशयीत आरोपी तिच्या घरापर्यंत सामान घेऊन आला होता. वृद्ध महिला घरात एकटीच रहात असल्याची संशयीत आरोपी मुकुंदा लोहार याने खात्री करुन घेतली होती. त्याचवेळी तिच्या अंगावरील दागिने चोरी करण्याचे त्याने ठरवले होते. यापुर्वी देखील दोन वृद्ध महिलांची त्या एकट्या रहात असल्याचे बघून दागिन्यांसाठी संशयीत आरोपीने हत्या केली होती. त्यातील एका गुन्ह्यातील नातेवाईकांनी कुठलीही पोलिस तक्रार केली नव्हती. दुस-या घटनेप्रकरणी अकस्मात यावल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार वसंत ताराचंद लिंगायत, युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ संदिप श्रावण सावळे, पोना किरण मोहन धनगर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, पोना राहुल जितेंद्रसिंग पाटील, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.