अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे प्रसुतीदरम्यान महिलेच्या पोटात नॅपकीन राहून गेल्याचे उघड झाले. त्यामुळे तो नॅपकीन बाहेर काढण्यात आला आहे. सविता दिलीप वाघ असे सदर रुग्ण महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा नॅपकीन महिलेच्या पोटात राहून गेल्याचा आरोप नातेवाईकांनी स्वराज संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत केला.
11 मे रोजी सविता वाघ यांना प्रसुतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीझर करण्याची नातेवाईकांनी परवानगी दिल्यानंतर ऑपरेशन करण्यात आले. दहा दिवसांच्या कालावधीनंतर सविता वाघ यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. घरी आल्यावर शस्त्रक्रियेच्या जागेतून पू निघत असल्याचे आणि वेदना होत असल्याचे सविता वाघ यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे पती दिलीप वाघ यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
वैद्यकीय तपासणीत महिलेच्या पोटात नॅपकीन असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. हा प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालयात शस्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वराज संघटनेने केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत अमोल इंगळे, प्रवीण बनसोड, नवनीत तंतरपाळे, प्रवीण खंडारे, दिलीप वाघ, मनोज वानखडे, अर्जुन इंगोले, पंकज साहू, गौतम मोहोड, अमोल जोंधळे, संदीप तायडे आदी उपस्थित होते. याप्रकरणाची जिल्हा स्त्री रुग्णालयाचे डॉ. तलम खान यांच्याकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे.