खंडणी मागणारा नाशिकचा पोलिस पत्नीसह अटकेत

नाशिक : पुणे येथील नगररचना उपसंचालकाकडे मुंबई एसीबीचा अधिकारी असल्याची बतावणी करत कारवाई थांबवण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागणा-या पोलिसाला त्याच्या पत्नी व अजून एकासह अटक करण्यात आली आहे. तिघेही पोलिसाच्या गणवेशात खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत होते.

गणेश संतोष पाटील, त्याची पत्नी जयश्री गणेश पाटील या दोघांना नाशिकच्या इंदिरानगर परिसरातून तर हर्षल श्रीकांत घाग याला ठाणे येथून पुणे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पुणे नगररचना उपसंचालक दत्तात्रय पवार (रा. वारजे जकात नाका, कर्वेनगर, पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी एक महिला व दोन पुरुष पोलिसांच्या गणवेशात त्यांच्या घरी आले. घरात आलेल्या तिघांनी पवार यांचे मोबाइल जमा करुन घेत आपण मुंबई एसीबी कार्यालयातून आल्याची बतावणी केली. तुमच्या विरुद्ध तक्रार असल्याचे सांगत पवार यांना मोबाईलमधील एक व्हिडीओ दाखवण्यात आला. तुमच्या विभागातील कर्मचाऱ्याने लाचेची रक्कम घेतली असून त्याने तुमचे नाव सांगितले असून तुम्हाला अटक करावी लागणार आहे अशी बतावणी करण्यात आली. तुमची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करायची असून हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे पवार यांना सांगण्यात आले.

तुमच्या वरिष्ठांचा मोबाईल क्रमांक द्या मी त्यांच्याशी बोलतो असे पवार तिघांना म्हणाले. दरम्यान पवार यांच्या मुलाला तिघांच्या बोलण्यावर संशय आला. मुलाने गस्तीवरील पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. पोलिस पथक घरी आल्यानंतर केलेल्या चौकशीत हा पैसे उकळण्यासाठी केलेला ड्रामा असल्याचे लक्षात आले. आपले पितळ उघडे पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनी पलायन करण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला. ज्या गाडीतून तिघे संशयीत आले ती गाडी हर्षल घाग याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे घाग यास ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नाशिकचा पोलिस कर्मचारी गणेश पाटील व त्याच्या पत्नीचे नाव उघड झाले. वृत्तपत्रात एसीबीच्या कारवाईची प्रसिद्ध झालेली बातमी वाचून आपल्याला ही आयडीया सुचल्याचे पोलिस कर्मचारी गणेश पाटील याने कबुल केले. पुण्यातील नगररचना विभागातील सहसंचालकावर एसीबीने केलेल्या कारवाईची ती बातमी होती. पवार हे शांत स्वभावाचे असल्यामुळे घाबरुन पैसे देवून टाकतील असा गणेश पाटील याचा समज झाला होता. या कटात त्याने आपल्या पत्नीसह घाग याला सहभागी करुन घेतले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here