जळगाव : 65 लाख रुपयांची संशयास्पद रोकड भरधाव कारने घेवून जाणा-या कारचालकास 5 जुलैच्या दुपारी खामगाव-नांदुरा महामार्गावर आमसरी गावानजीक पोलिसांच्या पथकाने पकडले. अथक प्रयत्नानंतर कारचालकाला ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले. या झटापटीत एक पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झला आहे.
कारचालक जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील कढोली येथील मयुर मंगल नन्नवरे (25) हा असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून सदर कारमालक पोलिस कर्मचारी असल्याचे समजते.
एएसपी पथकाचे प्रमुख पोलिस उप निरीक्षक पंकज सपकाळे, रघुनाथ जाधव, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गजानन आहेर, राम धामोळे आदींच्या पथकाने 5 जुलै रोजी दुपारी खामगावच्या टावर चौकात नाकाबंदी सुरु केली होती.
काही वेळातच एमएच 05 सीए 4721 ही संशयास्पद भरधाव वेगातील कार पथकाच्या नजरेस पडली. पोलिस पथकाने या कारला थांबवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र कारचालकाने ती थांबवली नाही. त्यामुळे पोलिस पथकाचा संशय अजूनच गडद झाला. कार अडवण्याचा प्रयत्न करतांना कारचालकाने त्याच्या ताब्यातील कार पोलिस नाईक गजानन आहेर यांच्या अगावर घातली. त्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलिस उप निरीक्षक पंकज सपकाळे यांनी चालकाच्या बाजूची काच फोडून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील कारचालकाने कार थांबवली नाही. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर आमसरी फाट्यानजीक कार व कारचालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. कारचालक मयुर मंगल नन्नवरे (25) रा. कढोली, ता.एरंडोल, जि.जळगाव यास ताब्यात घेण्यात आले आहे. 65 लाख रुपयांची रोकड कुणाची आहे?, कुठे नेली जात होती?, कार कुणाची? आदी प्रश्नांची उकल केली जात आहे.