जळगाव : एकटेदुकटे वयोवृद्ध हेरुन त्यांच्याकडील रोख रक्कम लुटणा-या दोघा परप्रांतीय इसमांना जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (58) रा. जलालनगर ता सदर जि. शहाँजहापुर आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (66) रा. बरेली (उ. प्र.) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
देवराम बाबुलाल चौधरी (72) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हे गेल्या वर्षात पोस्ट ऑफीसमधून काढलेले दिड लाख रुपये बॅंक ऑफ बडोदा येथे जमा करण्यास जात होते. त्यांच्यावर अब्दुल अलीम व बाबुलाल अग्रवाल या दोघा भामट्यांनी पाळत ठेवली होती. देवराम चौधरी यांच्या ताब्यातील बॅगेला ब्लेड मारुन दोघांनी त्यातील एक लाख रुपये चोरी केले होते. या घटने प्रकरणी देवराम चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासात पोस्ट ऑफीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या गुन्ह्यातील दोघे चोरटे पोस्ट ऑफीस परिसरात फिरत असल्याची माहिती गस्तीवरील पथकाला देण्यात आली. या माहितीच्या आधारे 6 जुलै रोजी स.पो.नि.राजेंद्र पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश देशमुख, हे.कॉ. सलीम तडवी, पोलिस नाईक जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे, रविंद्र साबळे आदींनी पोस्ट ऑफीस परिसर गाठला. दोघांना ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. अशा प्रकारचे जवळपास 30 गुन्हे त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश भागात केले असल्याचे देखील कबुल केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ सलीम तडवी करत आहेत.