जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जुन्या वादाचा वचपा काढण्यासह निरपराधांना अडकवण्यासाठी घडवून आणलेल्या तलवार हल्ल्याचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या तपासात बनावट हल्लेखोर उघड झाले असून असली निरपराध देखील निष्पन्न झाले आहेत. तसेच फिर्यादीचा खोटेपणा देखील उघड झाला आहे. सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांचे परिश्रम या तपासकामी फळाला आले आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल तलवार हल्ल्याच्या गुन्ह्यातील दोघे मास्टरमाईंड या तपासाच्या निमीत्ताने पुढे आले आहेत.
3 जुलैच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शाहू नगर येथे घरी परत येतांना बिग बजार परिसरात तिघांनी आपल्यावर तलवार हल्ला केल्याची फिर्याद इमरान खान मुस्ताक खान या तरुणाने जळगाव शहर पोलिस स्टेशनला केली होती. 3 जुलैच्या कथित हल्ल्याप्रकरणी 4 जुलै रोजी सदर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या कथित घटनेतील फिर्यादी इमरान खान याने सुमित संजय पोळ, सुरज उर्फ गोलू तुकाराम रणशिंग आणि प्रविण उर्फ पांडुरंग निंबाळकर (सर्व रा. शाहू नगर – जळगांव) या तिघांची नावे सादर केली.
सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, सायबर क्राईम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी आपले कसब पणाला लावत या गुन्ह्याचा तपास सुरु केला.
या घटनेतील फिर्यादीच्या म्हणण्यातील सत्यता पडताळून बघण्यासाठी सर्वप्रथम सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले. त्रयस्थ साक्षीदाराने दिलेली माहीती व सीसीटीव्ही फुटेज तपासणीत मिळालेली माहिती बघता फिर्यादी इमरान खान याने दिलेल्या माहितीत बरीच तफावत आढळून आली. त्यामुळे संशयाची पाल फिर्यादी इमरान खान याच्या दिशेने जावून स्थिरावली.
शाहू नगर परिसरातील रहिवासी राजेश मिश्रा याचे बालकदास बाबा याच्यासोबत जुने वाद आहेत. इमरान खान या तरुणाच्या मदतीने बालकनाथ बाबाचा वचपा काढण्यासाठी राजेश मिश्रा सरसावला. इमरान खान याला बनावट तलवार हल्ल्यात जखमी करुन आपले इप्सित साध्य करण्याचे राजेश मिश्रा याने ठरवले. तुला जखमी व्हावे लागेल असे राजेश मिश्रा याने इमरान खान यास म्हटले. मी तुला हॉस्पीटलमध्ये अॅडमीट करुन बाबा व त्याच्या माणसांच्या विरोधात तक्रार देतो असे राजेशने इमरान यास म्हटले होते. ठरल्यानुसार इमरान यास जखमी करण्यात आले.
पोलिस तपासात घटनेच्या रात्री साडे आठ ते दहा वाजेपर्यंत इमरान खान याच्या डोक्यावर कोणतीही जखम नसल्याचे आढळून आले आहे. तसा साक्षीदारांनी जबाब देखील नोंदवला आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमधे इम्रानखान व पोलिस तपासातील साक्षीदार एकत्र दिसून आले आहे. फिर्यादीत नमुद केलेली वेळ साधारण साडे नऊ वाजेची सांगण्यात आली आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधे रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत कथीत फिर्यादी तथा जखमी इमरान खान व कथित आरोपी कुणीही घटनास्थळावर आढळून आलेले नाही. तसेच रात्री अकरा वाजून चार मिनीटांनी राजेश मिश्रा हा फिर्यादी इमरान खान यास सोबत घेऊन दुचाकीने शाहू नगर परिसरातील हनुमान मंदीराजवळून घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधे दिसून आले आहे. वेळोवेळी इमरान खान व राजेश मिश्रा असे दोघे सोबत सीसीटीव्हीमधे दिसून आले आहे. एकंदरीत बालकदास बाबा याच्यासोबत राजेश मिश्रा याचे जुने वाद असल्याचे उघड झाले आहे. या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी त्याच्या जवळच्या माणसांना अडकवण्यासाठी निरपराध तिघांना अडकवण्यासाठी इमरान खान याला पुढे करण्यात आल्याचे पोलिस तपासात दिसून आले आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार, पोलिस नाईक उमेश भांडारकर, पोलिस कर्मचारी तेजस मराठे, नामदेव पाटील, सायबर सेलचे सोनवणे, सीसीटीव्ही टेक्निशियन महेश वर्मा आदींचे सहकार्य लाभले. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे व सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांचे विशेष परिश्रम लाभले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार करत आहेत.