गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

On: July 15, 2022 6:58 PM

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी समरस करणारा आहे. गांधीजींच्या अहिंसक समाजाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी प्रथम समाजाशी समरस होण्याची आवश्यकता गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी प्रतिपादित केली.

एक वर्ष चालणाऱ्या अभ्यासक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या डीन डॉ. गीता धर्मपाल, शिक्षणतज्ज्ञ अमोद कारखानीस, समन्वयक उदय महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. अश्विन झाला होते. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले कि, मानवी जीवनात हृदय (Heart), डोकं (Head) व हात (Hand) अर्थात भावना, विचार व काम या तीन गोष्टींवर यशस्विता अवलंबून असते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समूह जीवनाद्वारे शिकण्याची प्रेरणा देते. व्याख्याने, क्षेत्र भेट, सर्वेक्षण, इंटर्नशिप याद्वारे विचार प्रक्रियेला चालना दिली जाते. विचार प्रक्रियाच समाजात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा देत असतांना गांधी विचारच जगात शांती प्रस्थापित करतील व ते गांधी विचार पोहोचविण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महात्मा गांधीं संदर्भातील अनेक गैरसमज दूर होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी, ग्राम स्वराजची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हा अभ्यासक्रम लाभदायक ठरल्याची भावना व्यक्त केली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांमध्ये रक्तापलीकडचे नाते तयार झाले. आपल्या घरापासून कधीही दूर न राहिलेल्या या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाल्याचेही ते म्हणाले. गत २० वर्षात केवळ परीक्षा पास होण्यासाठी शिकलो मात्र गांधी रिसर्च फाऊंडेशनने एक वर्षात केवळ जीवनाला दिशा न देता त्यासंदर्भातील तयारी आमच्याकडून करून घेतल्याचे सांगितले. शाश्वत शेती (सस्टेनेबल फार्मिंग), ग्रामोद्योग या विषयांवर अधिक भर देण्याची आवश्यकताही त्यांनी सांगितली. दुर्गा, चेतन, सौरभ, प्रतीक, देवेश, प्रशांत, अदिती, वैभव, प्रांजली, अमित, मयुरी, आरती, शरद, प्रफुल्ल, निलेश, बंटी या यवतमाळ, भंडारा, नाशिक, लातूर आदी जिल्ह्यांसह गुजरात मधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. गीता धर्मपाल, अमोद कारखानीस व डॉ. अश्विन झाला यांनीही मनोगत व्यक्त केले. गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील, निर्मला झाला आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment