जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती स्कूलच्या 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. आयसीएसई बोर्डच्या 12 वी इयत्तेत 29 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी रितीका अरूण देवडा ही 99.25 टक्के गुणांसह पहिली आली. आत्मन अशोक जैन (97.75 टक्के) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून आत्मन हा शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. गौरवास्पद बाब म्हणजे संपूर्ण भारतातून आयसीएसई रॅंकच्या मेरिटमध्ये रितीका तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे.
अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील पहिलीच शाळा आहे. संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यातून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या निकालाची वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निकालामध्ये 90 टक्क्यांच्यावर आठ विद्यार्थी असून भारतातील रॅंक मेरिटमध्येसुद्धा विद्यार्थी चमकले आहेत. अनुभूती स्कूलमध्ये पहिल्या पाचमध्ये रितीका व आत्मन यासह तृतीय क्रमांकाने परिनिती अग्रवाल (95.75 टक्के), चतुर्थ क्रमांकाने उर्वेशा सुनिल नवघरे (94 टक्के), पाचव्या क्रमांकाने तन्वी अमित ओसवाल (93.75 टक्के) उत्तीर्ण झाले. प्रथम आलेल्या रितीका देवडा हिला गणित व वाणिज्य विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले आहेत तर इंग्रजीत 99, अर्थशास्त्र 98, अकाऊंट 95 गुण मिळाले आहेत. तर द्वितीय आलेल्या आत्मन जैन याला गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले. तर इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96 गुण प्राप्त झाले आहेत. तसेच विषयानुसार 90 गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीत 20, वाणिज्यमध्ये 9, अर्थशास्त्र व गणितमध्ये 6, बिजनेस स्टडी 5, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर, मानसशास्त्र, कला यात 2, बायोलॉजी व अकाउंटमध्ये 1 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
कोरोनासारखी महामारी त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदल अशा विपरीत परिस्थितीत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.
अनुभूती स्कूलच्या स्थापनेपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असल्याचा आनंद आहे. संपूर्ण देशात सीआयएससीई बोर्डच्या मेरिटमध्ये अनुभूतीची विद्यार्थीनी तिसरी आली, सोबत यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचे यश कौतूकास्पद आहे. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकतेतर कर्मचारी, पालकांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन! – अशोक जैन , अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स