जळगाव : एमआयडीसी परिसरातील अल्युमिनीयम वायर तयार करणा-या कंपनीतून 59 हजार रुपये किमतीचे कॉईल व सर्व्हिस वायरचे बंडल चोरी करणा-या फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण, रा.सुप्रिम कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे. सदर गुन्हा त्याने त्याचा साथीदार संतोष मोहन चव्हाण रा. पांडे किराणा समोर सुप्रिम कॉलनी याच्या मदतीने केल्याचे कबुल केले आहे.
19 जुलै 2022 रोजी गिता इंडस्ट्रीज या कंपनीत झालेल्या या चोरीप्रकरणी कंपनी मालक राहुल प्रताप गुरनानी यांनी फिर्याद दाखल केली होती. कंपनीच्या शटरला असलेले कुलपु तोडुन आरोपींनी आत प्रवेश करुन चोरीचा प्रकार केला होता. रेकॉर्ड वरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण याने हा गुन्हा केल्याची माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली होती. त्या माहितीच्य आधारे स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळकसर, सुधीर सावळे, इम्रान अली सैय्यद, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे आदींच्या पथकाने संतोष मोहन चव्हाण यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. न्या. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 30 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.