धुळे : दोन समाजात तेढ निर्माण होईल, धार्मिक भावना दुखाविण्याच्या उद्देशाने शांततेचा भंग होवून ती धोक्यात आणल्यामुळे गोरक्षक संजय शर्मा यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता़. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी संजय शर्मा यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक केली आहे़. १ ऑगस्ट रोजी शर्मा यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंदची घोषणा केली होती.
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गोरक्षक संजय शर्मा यांनी विविध जाहीर आरोप करत १ ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली होती. या बंद बाबत त्यांनी पोलिसांकडे कुठलीही परवानगी मागितली नव्हती. त्यामुळे पोलीस कर्मचारी चंदू श्यामराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित संजय शर्मा यांच्या विरोधात भा.द.वि. कलम १५३ – अ, २९५ – अ, ५०५ – २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.