जळगाव : गुजरात राज्यात खून, दरोडे अशा स्वरुपाचे गुन्हे करुन जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, एरंडोल व जळगाव परिसरात येत दहशत माजवणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सुनिल उर्फ सल्या लक्ष्मण पाटील (35) रा. पारोळा जि. जळगाव असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
त्याची दहशत बघून कुणीही नागरि त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. पारोळा पोलिस स्टेशनला जून 2022 मधे त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. जळगाव जिल्ह्यात आपले अस्तित्व लपवून तो वास्तव्य करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ. विजयसिंग पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, भगवान पाटील, नितीन बावीस्कर, किरण धनगर, परेश महाजन, प्रशांत ठाकूर महिला पोलीस अमलदार वैशाली सोनवणे आदींचे पथक त्याच्या शोधार्थ तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान तो वारंवार पळून जाण्यात यशस्वी होत असे. सुनिल उर्फ सल्या पाटील हा कुसुंबा गावातील जिजाऊ नगर परिसरात मुक्कामी असल्याची नव्याने माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पथकाने ताब्यात घेत त्याला अटक केली. पुढील तपासकामी त्याला पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.