लग्न करण्याची इच्छा-संदेश सोडत नव्हता मुलीचा पिच्छा– चाकूच्या 36 घावात दोघांनी दिली त्याला कायमची मुर्च्छा

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): चारचौघात दिसायला देखणी असलेली मधुबाला (काल्पनिक नाव) अजून अठरा वर्षाची देखील पुर्ण झालेली नव्हती. अल्पवयीन मधुबालाचे चारचौघात खुलून दिसणारे रुप बघून गावातील संदेश तिच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. तो तिच्या मागावरच रहात होता. शिक्षण घेण्यासाठी ती घरातून केव्हा जाते व घरी केव्हा परत येते याचे टाईमटेबल संदेशने माहित करुन घेतले होते. तिच्या वेळेनुसार तो तिच्या मागावर राहण्यात कोणतीही कसर सोडत नव्हता.

गावात राहणारा संदेश आपल्या मागावर रहात असल्याचे मधुबालाच्या लक्षात आले होते. तो एनकेन प्रकारे तिला प्रपोज करण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र घरुन निघणारी आणी घरी परत जाणारी मधुबाला खाली मान घालून नम्रतेनेच ये जा करत होती. संदेशने आपला सतत पिच्छा पुरवणे तिला खपत नव्हते. मधुबालाच्या मागावर राहून संदेश तिची छेडखानी करत असल्याचा प्रकार गावातील काही लोकांना समजला होता. त्यामुळे असह्य झालेला हा प्रकार तिने आपल्या घरी सांगितला. त्यामुळे तिच्या पालकांनी गावातील संदेश यास चांगल्या शब्दात समजावले. मात्र अंगात तरुण रक्त असलेला संदेश कुणाचे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. अल्पवयीन मधुबालाच्या अल्पवयीन भावाने देखील संदेशला वेळोवेळी समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. माझ्या बहिणीचा पाठलाग करु नको, तिला त्रास देवू नको अशा स्पष्ट शब्दात मधुबालाच्या भावाने त्याला प्रत्येकवेळी समजावले. मात्र नम्रता हा प्रकार संदेशला माहितीच नव्हता. तो उद्धटपणे मी मधुबालाला पळवून नेणार आहे. तिच्यासोबत लग्न करणार आहे, तुम्ही कुणी माझ्या वाटेत येवू नका अशी अरेरावीची भाषा संदेश वापरत होता. खुद्द मधुबालाने देखील संदेशची कानउघाडणी केली होती. मात्र तिच्या एकतर्फी प्रेमात वेडापिसा झालेला संदेश आपलीच बाजू पुढे दामटत होता. कितीही समजावले तरी संदेश ऐकत नव्हता आणि बहिण मधुबालाचा नाद सोडत नसल्यामुळे तिच्या अल्पवयीन भावाने नाईलाजाने टोकाचा निर्णय घेण्याचे ठरवले. आता संदेशला बघावेच लागेल असा विचार त्याने मनाशी केला. मनातील निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी तो कामाला लागला.

मधुबालाच्या भावाचा एक मित्र होता. तो देखील त्याच्याप्रमाणेच अल्पवयीन होता. आपल्या बहिणीला गावातील संदेश त्रास देत असल्याची व्यथा त्याने मित्राला कथन केली. मित्राची व त्याच्या बहिणीची व्यथा त्याने ऐकून घेतली. त्याने मधुबालाच्या भावाला सांगितले की अगोदर पुन्हा एकवेळा संदेशला समजावून बघ. त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे. मात्र संदेश कुणाचेच ऐकत नसून तो तिला पळवून नेण्याची भाषा करत असल्याची व्यथा तिच्या भावाने त्याच्या मित्राला सांगीतली. अखेर दोघा मित्रांनी संदेशला धडा शिकवण्याचे ठरवले. अखेर संदेशच्या जीवनातील तो अखेरचा दिवस जवळ आला. गेल्या काही दिवसांपासून मधुबालाचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे जण संदेशच्या मागावर होते. तो केव्हा आणि कुठे जातो? त्याचे सर्व लोकेशन ते आपल्या नजरेत टिपत होते.

9 ऑगस्ट 2022 रोजी मधुबालाचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे जण संदेशच्या मागावरच होते. रात्री साधारण नऊ वाजेच्या सुमारास दोघा मित्रांनी संदेशला एकांतात बोलावून घेतले. काही महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून त्याला येण्यास प्रवृत्त केले. मधुबाला विषयी काही महत्वाचे बोलणी करायची असेल या विचाराने त्याची कळी खुलली. तो लागलीच दोघांना भेटायला येण्यास तयार झाला.

Dr. Pravin Mundhe SP

ठरल्यानुसार 9 ऑगस्टच्या रात्री मधुबालाच्या भावासह त्याच्या मित्राला भेटण्यासाठी संदेश आला. दोघा मित्रांनी त्याला मोटार सायकलवर ट्रिपलसिट बसवून घेत कडगाव शिवारात एकांतात नेले. त्याठिकाणी दोघा मित्रांनी मिळून संदेशला पुन्हा समजावले की तु मधुबालाचा नाद सोडून दे. तिचा पिच्छा करु नको. ती तुझ्यासोबत लग्न करण्यास तर दूर ती तुझ्याशी बोलण्यास देखील तयार नाही. तीचे अजून लग्नाचे वय नाही. मात्र एवढे स्पष्ट शब्दात समजावून देखील संदेश आपल्याच तो-यात होता. मी लग्न करेन तर तिच्यासोबतच करेन. मी तीला पळवून नेणार आहे. असे बोलल्याने मधुबालाच्या भावासह त्याच्या मित्राचे रक्त तापले. आपल्याच बहिणीबद्दल आपल्याशी अशा प्रकारे संदेशचे बोलणे तिच्या भावाला आवडले नाही. सुरुवातीला त्याला समाजवण्याचा दोघा मित्रांनी भरपूर प्रयत्न केला. मात्र संदेश काही केल्या ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता.

अखेर संदेशला पाठमो-या अवस्थेत त्याच्या मानेवर मागच्या बाजूने मधुबालाच्या भावाने चाकूने वार केले. चाकूचे वार मानेवर मागच्या बाजूने होताच संदेश घाबरुन पळत सुटला. तो पळाल्याने दोघे मित्र त्याच्या मागोमाग धावले.  पळता पळता संदेश खाली पडला. तो खाली पडताच दोघांनी चाकूने त्याच्या अंगावर सपासप वार करण्याचे काम सुरुच ठेवले. चाकूचे जवळपास 36 घाव संदेशच्या अंगावर घालण्यात आले. बहुतेक घाव हे त्याच्या तोंडावर आणि छातीवर करण्यात आले होते. चाकूचे 36 घाव बसल्यानंतर संदेशचे जीवंत राहणे कठीण होते. त्याचा बचाव करण्यासाठी त्या निर्जन स्थळी कुणीही नव्हते. तो दोघा मित्रांच्या रुपात एकप्रकारे मृत्यूला भेटण्यासाठीच आला होता. दोघे मित्र हे संदेशसाठी एकप्रकारे मृत्यूचे माध्यम ठरले होते. संदेश मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर दोघा मित्रांनी रक्ताने भरलेले अंगातील कपडे फेकून देत घरची वाट धरली. गावात आल्यानंतर दोघांनी त्यांच्या मित्रांना सांगितले की आम्ही संदेशचे काम फिनीश केले आहे. कुणालाच काही सांगू नका.

आदल्या रात्री 9 ऑगस्ट रोजी जेवण आटोपल्यानंतर साडेनऊ वाजता संदेश घराबाहेर पडला होता. आलेल्या शेवटच्या मोबाईल कॉलवर बोलणे केल्यानंतर तो रात्रीच घराबाहेर पडला होता. सकाळ झाली तरी संदेश घरी आला नाही. त्यामुळे त्याची आई चिंता करु लागली. वाट बघत बघत त्याची आई रात्री झोपून गेली होती. सकाळी पाच वाजता तिला संदेश जागेवर दिसला नाही. आपला मुलगा संदेश कुठे गेला असेल या विचारात त्याच्या आईने शेजारी पाजारी विचारपूस केली. त्याला फोन लावला असता तो स्विच ऑफ येत होता.

संदेशचा तपास सुरु असतांना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास समजले की कुणातरी तरुणाचा मृतदेह कडगाव शिवारातील नाल्यात पडलेला आहे. गावातील काही लोक प्रातर्विधी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कुणाचा मृतदेह पडला आहे ते उत्सुकतेने बघण्यासाठी संदेशची आई देखील घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान या घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना समजली होती. माहिती मिळताच नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अलियार खान, संजय जाधव, हे.कॉ. शिवदास चौधरी, अतुल महाजन, पोलिस नाईक रविंद्र इंधाटे, किरण बाविस्कर, पोलिस नाईक समाधान पाटील, चालक हशमत अली, पो.कॉ. रुपेश साळवे, विजय अहिरे, बाळू पाटील, गणेश गायकवाड, दिनेश भोई, महिला पो.कॉ. लिना लोखंडे तसेच बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक रमन सुरळकर, पोलिस नाईक यासिन पिंजारी आदी घटनास्थळी हजर झाले. काही वेळाने घटनास्थळी स्वत: पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे आदी उच्च पदस्थ अधिका-यांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या.

घटनास्थळी जमलेल्या गावातील लोकांनी मयत तरुणाला ओळखले होते. घटनास्थळी आलेल्या संदेशच्या  आईने देखील हा आपलाच मुलगा असल्याचे ओळखले होते. मृतदेहाची ओळख पटली होती. त्यामुळे पोलिस तपासाचा अर्धा ताण कमी झाला होता. आता मयत संदेशचे मारेकरी कोण होते? एवढ्या निर्घृणपणे चाकूहे 36  वार करुन त्याची हत्या का केली या प्रश्नांचा उलगडा लावणे पोलिसांसाठी एक आव्हान होते. मयत संदेशच्या आईने दिलेल्या खबरीनुसार नशिराबाद पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 103/22 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अनिल मोरे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला.

नशिराबाद पोलिस स्टेशनचे पो.नि. अनिल मोरे यांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने गावातून कानोसा घेतला. मयत संदेश अढाळे हा गावातील एका अल्पवयीन मुलीच्या कायम मागावर रहात होता अशी माहिती त्यांना मिळाली. त्या अल्पवयीन मुलीची इच्छा नसतांना देखील तो तिच्यासोबत लग्न करण्यासाठी कायम आग्रही भुमिका घेत असे. तिला पळवून नेण्याच्या गोष्टी मयत संदेश हा तिच्या भावासोबत करत होता असे देखील स.पो.नि. अनिल मोरे यांना खब-यांकडून समजले. हा प्रकार गावातील काही लोकांना माहिती होता.

घटना उघडकीस येण्यापुर्वी बेपत्ता झालेल्या संदेशने त्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले असावे असा गावातील काही लोकांचा समज झाला. मात्र सकाळी त्या अल्पवयीन मुलीला प्रातर्विधी करण्यासाठी जातांना काही लोकांनी पाहीले. मात्र संदेश दिसत नव्हता. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे भाकीत काही गावक-यांनी खासगीत वर्तवले.

घटनेच्या आदल्या रात्री मयत संदेश अढाळे याला शेवटचा कॉल करणारा कोण होता याचा देखील तपास स.पो.नि. अनिल मोरे यांनी सुरु केला. तपासाअंती त्या अल्पवयीन मुलीच्या अल्पवयीन भावाने मयतास कॉल केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयाची सुई त्या अल्पवयीन मुलाभोवती फिरु लागली. त्याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. अनिल मोरे यांनी त्याची अगदी शांततेत विचारपुस केली असता त्याने सगळा घटनाक्रम कथन केला. या गुन्ह्यात आपल्या अल्पवयीन मित्राचा देखील सहभाग असल्याचे त्याने कबुल केले. अशा प्रकारे त्याच्या साथीदाराला देखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल झाली. गुन्ह्यात वापरलेले हत्यार व गुन्ह्याचे वेळी अंगावर असणारे कपडे तपासकामी जप्त करण्यात आले. दोघा अल्पवयीन बालकांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अनिल मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here