धुळे : धुळे शहरातील चितोड रस्त्यावर असलेल्या कैलास नगरातील रहिवासी खासगी वाहन चालक दीपक दाभाडे या तरुणाची मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरनजीक चौघा प्रवाशांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे.. चौघे मारेकरी धुळे शहरातून दीपकच्या वाहनात प्रवाशाच्या रुपात बसले होते. वाटेत अमळनेर नजीक चौघांनी मद्यपान केले. चौघांचे वर्तन दिपकला संशयास्पद वाटले. त्यामुळे त्याने चौघांसोबत फोटो काढून तो पत्नीला पाठवला होता.
दीपकचे खासगी वाहन असून त्याला रविवारी 28 ऑगस्ट रोजी चौघांना घेवून मध्य प्रदेशात जाण्यासाठी एका लॉजमधून बोलावणे आले. दीपकने गल्ली क्रमांक दोनमधील एका लॉजमधून चौघांना सोबत घेत प्रवासाला निघाला. सायंकाळी साडेसात वाजता चौघांना घेऊन दीपक कारने बऱ्हाणपूरच्या दिशेने निघाला होता. अमळनेर नजीक चौघांनी मद्यपाशन केले. दीपकला व्यसन नसल्यामुळे तो त्यांच्यात सामिल झाला नाही. मात्र त्यांचे वागणे संशयास्पद वाटल्याने त्याने पत्नीला फोन करुन फोटो पाठवून कल्पना दिली होती.
बऱ्हाणपूर येथे पोहोचल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता दिपकने घरी फोन केला. शिवाय पत्नीला झोपण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मात्र त्याचा संपर्क झाला नाही. त्यानंतर सिहोर जिल्ह्यानजीक झाडाझुडूपांमधे त्याचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटली. त्याची कार व त्याच्याजवळ असलेले पैसे लुटून नेण्यात आले होते. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत धुळे शहर पोलिसांनी हॉटेल गाठून संशयीत मारेक-यांचे फोटो आणि आधार कार्ड मध्यप्रदेशात शिकारपूर पोलिसांना पाठवले. त्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेश पोलिस पुढील तपास करत आहेत.