औरंगाबाद : कामाला जात असतांना वाटेत पोलिसांच्या गाडीवर 112 क्रमांक कामगार तरुणाच्या वाचण्यात आला. त्याने सहज त्या क्रमांकावर फोन लावला. पलीकडून आपण कोण बोलताय? काय मदत पाहिजे? अशी विचारणा करण्यात आली. सहज टाईमपास म्हणून त्या तरुणाने आज चार वाजता मी कोणतेही पोलिस स्टेशन बॉंम्बने उडवून देईन अशी धमकी दिली.
ऐन गणेशोत्सव कालावधीत मिळालेल्या धमकीने पोलिस यंत्रणा सज्ज झाली. तातडीने धावपळ करत सर्व पोलिस स्टेशनला बॉंब स्क्वाड पथक सक्रीय करण्यात आले. सायबर आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु करत कॉल करणा-या शुभम वैभव काळे (23) संजयनगर मुकुंदवाडी औरंगाबाद या तरुणास हुडकून काढले. नववी पास असलेल्या या तरुणाने कामगार तरुणाने आपण सहज फोन केल्याचे पोलिसांना सांगितले.
सिडको एमआयडीसी भागातून सदरचा कॉल आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पोलिस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सहायक फौजदार सतीश जाधव, जितेंद्र ठाकूर, संजय राजपूत, विठ्ठल सुरे यांच्या मदतीने विविध कंपन्यांमधे जावून काळे नावाच्या इसमाचा शोध घेतला. त्यात त्यांना यश आले. एका कंपनीतून शुभम काळे याला ताब्यात घेण्यात आले.