जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती…. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती…….. प्रसिद्ध मराठी गायक “सुधीर फडके” यांनी “ते माझे घर” या चित्रपटासाठी गायलेले हे अजरामर गित जळगाव पोलिस अधिक्षकांच्या निसर्गरम्य शासकीय निवासस्थान परिसरात तंतोतंत खरे ठरल्याचे आज दुपारच्या वेळी दिसून आले.
5 सप्टेबर 2022 दुपारी साधारण दोन वाजेची वेळ……..उन्हाचा असह्य होणारा उकाडा…… पोलिस अधिक्षक बंगला परिसरात काव्यरत्नावली चौकानजीक रस्त्याच्या कामावरील काही सन्माननीय श्रमिक महिला काम करुन थकल्या भागल्या होत्या. दुपारचे जेवण करुन त्या सन्माननीय श्रमिक महिलांना वामकुक्षीची गरज होती. पोलिस अधिक्षकांचा बंगला परिसर घनदाट झाडीचा असल्यामुळे साहजीकच या परिसरात सावली आणि शांत निसर्गरम्य वातावरण असते.
वामकुक्षीसाठी जागा शोधणा-या या श्रमिक महिलांना थेट पोलिस अधिक्षकांच्या प्रवेशद्वाराची जागा गवसली. या प्रवेशद्वाराच्या कडेलाच या महिलांनी आपले जेवणाचे रिकामे डबे ठेवून वामकुक्षी घेतली. एअर कंडीशनची पेड थंड हवा घेण्याची क्षमता नसली तरी निसर्गनिर्मीत मोफत शुद्ध हवा नक्कीच या ठिकाणी या महिलांना लाभली असणार यात शंका नाही. लिहीता वाचता येत नसलेल्या या अशिक्षीत, असंघटीत मात्र सन्मानाने श्रमाचे काम करणा-या या श्रमिक महिलांना हा बंगला कुणाचा?…… हे प्रवेशद्वार कुणाचे? याचे ज्ञान नक्कीच नव्हते. अज्ञानात सुख असते असे म्हणतात ते देखील खरेच आहे.