धरणावर फोटोसेशनच्या नादात पाण्यात पडलेला तरुण बेपत्ता

जळगाव : धरण बघण्यासाठी आलेला तरुण फोटोसेशनच्या नादात पाय घसरुन पाण्यात वाहून गेला आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कांताई बंधारा नजीक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. नयन योगेश निंबाळकर (रा.मिथीला सोसायटी दुध फेडरेशन नजीक जळगाव) असे वाहून गेलेल्या सतरा वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. प्रशासनाकडून त्याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

जळगाव येथील कांताई बंधारा नजीक असलेल्या नागाई जोगाई मंदीर परिसरात सुमारे अकरा तरुण धरण बघण्यासाठी आले होते. धरण बघत असतांना निसर्गरम्य वातावरणात फोटोसेशन करण्याच्या त्यांना मोह झाला. या मोहाला बळी पडून फोटो काढत असतांना पाय घसरल्याने नयन योगेश निंबाळकर हा पाण्यात पडला. काही कळण्याच्या आत तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तो वाहून गेल्याचे लक्षात येताच आलेल्या तरुण – तरुणींनी एकच हल्लकल्लोळ केला.

दरम्यान समीक्षा बिपिन शिरोडकर (17), सागर दामू पाटील (24) आणि योगिता दामू पाटील (20) हे तिघे देखील पाण्यात बुडाले. त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. मात्र त्यांना वेळीच पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र पाण्यात वाहून गेलेल्या नयन योगेश निंबाळकर याचा अद्याप शोध लागला नसून प्रशासनाच्या वतीने त्याचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here