पुणे : हुबेहुब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसणा-या आणि हवाबाजी करणा-या तरुणाविरुद्ध पुणे येथील बंडगार्डन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय नंदकुमार माने असे त्या डुप्लिकेटचे नाव आहे.
विजय माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखीच दाढी वाढवली असून कपाळावर टिळा तसेच पांढरे कपडे परिधान केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याचे फोटोसेशन समाज माध्यमांमधे प्रसारित झाले होते. शरद मोहोळ या सराईत गुन्हेगारासमवेत त्याने फोटोसेशन केले होते. ते फोटो समाज माध्यमांमधे प्रसारित झाले होते.
खंडणी विरोधी पथक दोनचे पीएसआय मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलीस स्टेशनला विजय माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि. 419, 511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय नंदकुमार माने याने जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करत तोतयेगिरी केल्याचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलिन करण्यासाठी गुन्हेगारासोबत फोटो काढून तो व्हायरल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अद्याप माने यास अटक करण्यात आलेली नाही.