जळगाव : व्हाटसअॅप क्रमांकावर संपर्क साधत विश्वास संपादन करुन फटाका विक्रेत्याची 2 लाख 41 हजार 500 रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय लक्ष्मण पाटील सागर पार्क जवळ रामदास कॉलनी असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
धनंजय पाटील यांच्या व्हाटसअॅप क्रमांकावर शेखर मखिजा फटाके डिलर या नावाने एकाने चॅटींग करत विश्वास संपादन केला. पलीकडून संपर्क साधणा-या इसमाने धनंजय पाटील यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून 2 लाख 41 हजार 500 रुपयांची फटाक्यांची ऑर्डर घेतली. या रकमेचा चेक शिला चौरसिया या महिलेच्या नावे धनंजय पाटील यांनी बॅंक ऑफ इंडीयात जमा केला. चेकची रक्कम वळती झाल्यानंतर देखील धनंजय पाटील यांना फटाके मिळाले नाही. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनंजय पाटील यांनी सायबर पोलिस स्टेशनला कथित शेखर मखिजा नामक इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे पुढील तपास करत आहेत.