जळगाव : महात्मा गांधी यांच्या जन्म दिवस विश्व अहिंसा दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सालाबादाप्रमाणे अहिंसा सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा गांधीजींची१५४ वी जयंती व लाल बहादूर शास्त्रीजींची ११९ वी जयंती निमित्ताने आयोजित अहिंसा सद् भावना शांती यात्रा २ आॕक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टाॕवरपासून निघून सरदार वल्लभभाई पटेल टाॕवर म.न.पा. मार्गे पंडीत जवाहरलाल नेहरू चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गाने महात्मा गांधी उद्यानात यात्रा पोहचेल. त्यानंतर महात्मा गांधी उद्यानात विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी प्रमुख वक्ते म्हणून संबोधन करतील तर अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डाॕ. सुदर्शन अय्यंगार असतील ते यावेळी उपस्थितीतांना अहिंसेची शपथ देतील.
शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अहिंसा सद् भावना यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.