आयकर विभागाने काही चीनी नागरीकांसह त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडींमधे 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक हवालाचे व्यवहार समोर आले आहेत. प्राप्तीकर विभागाने दिल्ली आणि एनसीआर भागात कुणाला सुगावा लागु न देता एकाचवेळी या धाडी टाकल्या आहेत.
शेल कंपन्यांकडून पैशांची अफरातफर सुरु होती. या रॅकेटमध्ये काही चिनी नागरिक व त्यांचे भारतीय सहकारी तसेच काही बँक कर्मचारी सहभागी होते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने रात्री या धाडींची माहिती दिली.
प्राप्तीकर विभागाने दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्रामच्या 21 जागी हे छापे टाकले. सीबीडीटीने कंपन्यांची नावे जाहिर केली नाहीत. यामध्ये चीनच्या मोठ्या कंपन्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीडीटीने केलेल्या या छापासत्रात हवाला व्यवहार आणि पैशांची अफरातफर प्रकरणी काही दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.
तपासातील पैशांच्या अफरातफरीचा आकडा जवळपास 1000 कोटींपेक्षाही जास्त आहे. चिनी नागरिकांच्या आदेशावर बनावट कंपन्यांचे चाळीसपेक्षा जास्त बँक खाती आहेत. यात 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. सबसिडी मिळालेल्या चिनी कंपन्या व संबंधीत शेल कंपन्यांद्वारे भारतात बनावट उद्योग करण्याचा नावाखाली सुमारे शंभर कोटींची रक्कम अॅडव्हांस घेतली असल्याचे समजते. या व्यवहारात हॉंगकॉंगसह अमेरिकी डॉलरचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.