जळगाव : गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिसांना मदत होण्यासाठी विविध पोलिस स्टेशनला ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामरक्षक दलाच्या सहकार्याने जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. शेतशिवारातील चो-यांना आळा बसण्यासाठी 29 सप्टेबर रोजी सायंकाळी एमआयडीसी हद्दीत रायपूर येथील रहिवासी संजय धनसींग परदेशी व त्यांच्यासोबत वसंत सिताराम धनगर, विजय मोहन परदेशी, दिलीप धनगर, दिलीप शालीग्राम परदेशी असे ग्रामरक्षक दलाचे पथक संचलन करत होते. दरम्यान या पथकाला कंडारी गावानजीक नाल्याजवळ एक मोटार सायकल आढळली. या पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी जवळ जावून पाहणी केली असता त्यांना संजय परदेशी यांच्या शेताजवळ नाल्याच्या पाण्यातुन दोन इसम पाण्याची मोटार काढतांना दिसून आले होते.
ग्राम रक्षक पथकातील सर्व जण त्या दोघांना पकडण्यास गेले असता ते पळून जाण्यात यशस्वी झाले होते. चोरी करणारे पळून जातांना संजय परदेशी यांच्या शेतातील इलेक्ट्रीक मोटार, स्टार्टर, कॉपर वायर असा सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पळून गेले होते. मात्र मोटार सायकल घटनास्थळी तशीच सोडून गेले होते. संजय धनसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थाळावर चोरटे सोडून गेलेल्या मोटार सायकलच्या आधारे तपासाला वेग आला. पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा चोरीचा गुन्हा संजय नामेदव भिल व राहुल युवराज बागडे उर्फ गोलू यांनी केल्याचे निष्पन्न झाले. चोरीची घटना घडल्यापासून ते कंडारी गाव सोडून फरार झाले होते. संजय नामदेव भिल हा कंडारी गावात आल्याची माहिती पो. नि. प्रताप शिकारे यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील स. फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पो.कॉ. मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, किशोर पाटील, होमगार्ड विजय कोळी आदींना रवाना केले. पथकातील कर्मचा-यांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोघांना न्या. जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता सुरुवातील त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. गुन्हा उघडकीस आणणा-या ग्रामसुरक्षा दलाचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.