देत नाही दहा हजार म्हणत सौरभने दाखवला ताव;  संतप्त इश्वरने घातला त्याच्या डोक्यावर खूनी घाव!! 

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): इश्वर नथु सपकाळे आणि सौरभ यशवंत चौधरी हे दोघे मित्र होते. दोघांना दम मारण्याची अर्थात गांजा ओढण्याची सवय होती. दम मारला की गम मिटतात या विचारसरणीचे दोघे मित्र सोबतच दम मारण्यासाठी बसत होते. इश्वर सपकाळे हा जळगावच्या जैनाबाद परिसरातील हरीओम नगरात रहात होता. सौरभ चौधरी हा जळगाव शहरातील काशीबाई उखाजी विद्यालय परिसरातील दशरथ नगरात रहात होता. सौरभच्या वडीलांचे रेल्वे अपघातात निधन झाले होते. त्यामुळे त्याची आई किराणा दुकान चालवून संसाराचा गाडा ओढत होती. सौरभ मात्र कोणताही कामधंदा करत नव्हता. उलट आईच्या किराणा दुकानाच्या आलेल्या रकमेतून तो त्याचे दारु आणि गांजाचे व्यसन पुर्ण करत होता. त्याच्या गांजा आणि दारुच्या व्यसनाला त्याची पत्नी वैतागून माहेरी निघून गेली होती. त्याची आई देखील त्याला वैतागली होती. मात्र त्याची मायमाऊली त्याला कसेबसे सांभाळून घेत होती. कसलीही पर्वा नसलेल्या सौरभच्या मनावर कुठलाही परिणाम होत नव्हता. तो आपले व्यसन पुर्ण करण्याची तेवढी काळजी करत होता.  

एके दिवशी सौरभला दहा हजार रुपयांची गरज पडली. आपल्या गरजपुर्तीसाठी त्याने इश्वरकडे दहा हजार रुपये उधार मागितले. इश्वरकडे दहा हजार नसल्यामुळे त्याने सौरभला ते देण्यास नकार दिला. मात्र कुठूनही दहा हजार रुपयांची व्यवस्था कर अशी विनवणी सौरभने इश्वरकडे केली. सौरभच्या मनधरणीसाठी कधी होकार, कधी नकार देत इश्वरने वेळ मारुन नेण्याचे काम सुरु ठेवले. त्यात काही दिवस असेच निघून गेले. मात्र दहा हजार रुपये उधार मिळण्यासाठी सौरभची इश्वरकडे विनवणी सुरुच होती. त्यामुळे इश्वरने त्याच्या एका मित्राकडून दहा हजार रुपये उधार घेवून ते सौरभला उधार दिले. अशा प्रकारे एका मित्राकडून घेवून दुस-या मित्राला दहा हजार रुपये देण्याचे काम इश्वरने केले. मात्र वेळेवर पैसे परत कर असे इश्वरने सौरभला वेळीच पैसे देतांना बजावले होते. कारण ज्या मित्राकडून ही रक्कम घेतली आहे त्याला ती वेळेवर परत करण्याची जबाबदारी माझी आहे हे देखील इश्वरने सौरभला जाणीवपुर्वक बजावले होते.

दहा हजार मिळाल्यामुळे सौरभची निकड पुर्ण झाली होती. आता लवकरात लवकर ती रक्कम इश्वरला परत करण्याची जबाबदारी सौरभची होती. मात्र गांजा ओढण्याची सवय असलेला सौरभ ती रक्कम लवकर काळजीपुर्वक परत देण्याचे नावच घेत नव्हता. माझ्याकडे येतील तेव्हा मी तुला परत करेन असे निष्काळजी उत्तर सौरभ देवू लागला. त्यामुळे इश्वर मनातून चिडला होता. आपण उगाच एका जणाकडून उधार घेवून ते सौरभला उधार दिले असा पश्चाताप इश्वरला होण्यास सुरुवात झाली होती. 

LCB Jalgaon Team

दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने जात होते. सौरभ मात्र दहा हजार रुपये परत करण्याचे नावच घेत नव्हता. माझ्याकडे येतील तेव्हा मी देईन असे त्याचे ठरलेल्या साच्यातील उत्तर तयार रहात होते. इकडे मध्यस्त इश्वरची मात्र गोची झाली होती. त्यामुळे सौरभकडे वारंवार पैसे मागणे हा एकच पर्याय त्याच्याकडे उरला होता. शुद्धीवर असतांना सौरभचे ठरलेले उत्तर नशेत असतांना एकदम विरुद्ध होत असे. गांजाच्या नशेत सौरभ असला म्हणजे “जा ….. मी नाही देत तुझे दहा हजार रुपये….. तुला काय करायचे ते करुन घे” हे उत्तर सौरभच्या मुखातून इश्वरला ऐकण्यास भाग पडत होते. मला जास्त त्रास दिल्यास अथवा जास्त मागे लागल्यास मी तुला जीवानिशी मारुन टाकेन असे देखील इश्वरला ऐकावे लागत होते.

आता सौरभचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल या निर्णयाप्रत इश्वर आला होता. लोखंडी रॉड आणि विळा या दोन हत्यारांची इश्वरने व्यवस्था करुन ठेवली. 2 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या सुमारास इश्वरने त्याच्या वहिनीच्या मोबाईलवरुन सौरभला कॉल केला. तु कुठे आहेस? असा प्रश्न त्याने सौरभला केला. “मी श्रीराम चौकात दांडीया बघतो आहे” असे उत्तर पलीकडून सौरभने इश्वरला दिले. सौरभचे लोकेशन समजताच इश्वर त्या ठिकाणी त्याच्याजवळ गेला. चल आपण दोघे जण दम मारु (गांजा ओढू) असे इश्वरने सौरभला म्हटले. गांजा ओढण्यास मिळत असल्याचे समजताच सौरभची कळी खुलली. तो गांजाच्या मोहात पडून लागलीच त्याच्यासोबत येण्यास तयार झाला. दोघे जण मोटार सायकलने इश्वरच्या मामाच्या कानसवाडा शिवारातील शेतात पाटचारीवर गेले. सौरभने गावठी दारुची बाटली देखील प्राशन करण्यासाठी सोबत घेतली होती. त्याठिकाणी दोघे गांजा ओढत बसले. रात्रीच्या थंडगार हवेत गांजा ओढत असतांना नेहमीप्रमाणे इश्वरने सौरभला त्याच्या दहा हजार रुपयांची मागणी केली. नेहमीप्रमाणे यावेळी देखील सौरभने त्याला “जा…….. नाही देत तुझे दहा हजार रुपये…… तुला काय करायचे ते करुन घे…… जास्त त्रास दिल्यास तुला गोळ्या घालून जीवानिशी मारुन टाकेन” असे उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकून इश्वरचे टाळके फिरले. थोडा संयम आणि थोडी हुशारी वापरत इश्वर शांत बसला.

मी शौचाला जावून लवकरच परत येतो असा बहाणा करत इश्वर तेथून हत्यार घेण्यासाठी निघाला. लपवून ठेवलेला लोखंडी रॉड आणि विळा हे दोन्ही हत्यार त्याने सोबत घेत पुन्हा सौरभ जवळ आला. हत्यारांसह इश्वर आला असता दारु आणि गांजाच्या नशेत सौरभ पाटचारीवर गाढ झोपून गेल्याचे त्याला दिसले. सौरभ नशेत बेसावध असल्याचे बघून इश्वरने त्याला ठार करण्याची संधी साधली. हातातील लोखंडी रॉड त्याने दारु आणि गांजाच्या नशेत झोपलेल्या सौरभच्या डोक्यात हाणला. लोखंडी रॉडचा जोरदार हल्ला डोक्यात झाल्यामुळे सौरभ जोरजोरात कन्हू लागला. तो कन्हत असतांनाच इश्वरने त्याच्या गळ्यावर आणि पोटावर विळ्याचे घाव घालण्यास सुरुवात केली. अगोदर रॉडचा डोक्यात घाव बसल्यामुळे सौरभ जमीनीवर उठू शकत नव्हता. त्यातच तो दारु आणि गांजाच्या नशेत असल्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती संपुष्टात आली होती.

मोटार सायकलच्या डिक्कीत दोन्ही हत्यार ठेवत त्याने तेथून मोटार सायकलने पलायन केले. वाटेत आसोदा – ममुरबाद गावाच्या दरम्यान रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार फेकून दिले. त्यानंतर रात्रीच घरी परत आला आणि कुणाला काही न सांगता झोपून गेला. सकाळीच आतेभावाला त्याने कामानिमीत्त पैसे मागितले. आतेभावाकडून पैसे मिळताच मी कामासाठी बाहेर जात आहे असे सांगून इश्वर तेथून निघाला.

सकाळ झाल्यानंतर भादली शिवारात पाटचारीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सौरभचा मृतदेह परिसरातील लोकांच्या नजरेस पडला. सुरुवातीला मयत सौरभचा मृतदेह सर्वांसाठी अनोळखी होता. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे आदी अधिकारी आपआपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळवर दाखल झाले. घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेमुळे भादली गावासह परिसरात मोठी खळबळ माजली होती.

मयत तरुणाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. मयत तरुण हा सौरभ यशवंत चौधरी (वय 31), रा. दशरथ नगर, का. उ. कोल्हे शाळेजवळ जळगाव असल्याचे उघड झाले. घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. सौरभचा खून कुणी व कशासाठी केला हा पोलिसांसाठी तपासाचा भाग होता. या घटनेप्रकरणी मयत सौरभच्या आईने नशिराबाद पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील व त्यांचे सहका-यांनी सुरु केला होता.

मयताची ओळख पटली असल्यामुळे तपासाचा जवळपास निम्मा ताण कमी झाला होता. आता केवळ मारेकरी कोण आणि त्याने हा खून कोणत्या कारणासाठी केला? या दोन प्रश्नांची उकल करणे बाकी होते. तांत्रीक तपासादरम्यान मयत सौरभच्या मोबाईलवर शेवटचा कॉल कुणाचा आला, अथवा त्याने शेवटचा कॉल कुणाला केला याचा तपास करण्यात आला. त्याचा मोबाईल सीडीआर तपासला असता त्यात एका महिलेचा फोन नंबर आढळून आला. त्या महिलेचा तपास केला असता आपण मयत सौरभला कॉल केलाच नसल्याचे पोलिसांना कथन केले. मात्र आपला मोबाईल आपला दीर इश्वर नथु सपकाळे हा देखील वापरत असल्याचे त्या महिलेने अधिक माहिती देतांना सांगितले. इश्वर कुठे आहे याबाबत तिच्यासह कुटूंबातील सर्वांना विचारले असता तो 3 ऑक्टोबर पासून घरी नसल्याचे उघड झाले. आपण कामाला जात असल्याचे कारण सांगून आतेभावाकडून त्याने काही रुपये उधार घेतले होते. त्यानंतर सकाळीच घरातून गेलेला इश्वर अद्याप घरी आलेला नव्हता अशी माहिती पोलिस चौकशीत आणि तपासात समोर आली. त्यामुळे संशयाची सुई इश्वर सपकाळे याच्या दिशेने स्थिरावली होती. इश्वर याला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतरच गुन्ह्याचा उलगडा होणार होता. नशिराबाद पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक इश्वर सपकाळे याच्या मागावर होते. मयत सौरभच्या आतेभावकडे इश्वरचा आतेभाऊ कामाला आहे.   

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी संशयीत आरोपी इश्वर सपकाळे याच्या मागावर होते. त्याच्या शोधकामी एका पथकाची निर्मीती करण्यात आली होती. त्या पथकात सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार रवी नरवाडे, हे.कॉ. संजय हिवरकर, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोलिस नाईक रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर राठोड, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, इश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव आदींचा सहभाग करण्यात आला. या पथकाने विविध गावांना जावून परिसर पिंजून काढत त्याचा कसून शोध घेण्याचे काम सुरु केले होते.

पोलिसांना हवा असलेला इश्वर नथु सपकाळे आणि मयत सौरभ यशवंत चौधरी हे दोघे मित्र होते आणि त्यांच्यात व्यवहारातून वाद सुरु होते अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना एका बातमीदाराकडून मिळाली. फरार इश्वर सपकाळे हा कानळदा गावचा मुळ रहिवासी मात्र सध्या जळगावला राहणारा होता. तो कानळदा येथे येणार असल्याची गुप्त माहिती देखील पो.नि. किसनराव नजनपाटील यांना गुप्त बातमीदाराने दिली. या माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी एलसीबी पथकाने त्याला कानळदा शिवारातून ताब्यात घेत अटक केली. त्याला पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ करणारा इश्वर सपकाळे पो.नि.किसनराव नजनपाटील यांचा करडा आवाज आणि पोलिसी रुबाब बघून चक्रावला. त्याने हळूहळू आपला सर्व गुन्हा कबुल करत घटनाक्रम देखील कथन केला. आपण मयत सौरभ चौधरी यास दहा हजार रुपये उधार दिले होते. मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतर देखील ते पैसे परत करत नव्हता. माझ्याकडे येतील तेव्हा मी परत करेन असे तो सांगून पैसे देण्यास सौरभ टाळाटाळ करत होता. ज्या मित्राकडून इश्वरने दहा हजार रुपये घेवून सौरभला दिले होते तो मित्र इश्वरला ते पैसे मागत होता. त्यामुळे इश्वर दुहेरी कचाट्यात फसला होता. घटनेच्या दिवशी दोघे जण गांजा ओढण्यासह दारु पिण्यास बसले होते. मी तुझे पैसे देत नाही…..जा तुला काय करायचे ते करुन घे असे शब्द दारु आणि गांजाच्या नशेत त्यावेळी सौरभने इश्वरला बोलतांना वापरले होते. त्यामुळे पुर्व नियोजीत कट रचल्यानुसार इश्वरने लोखंडी रॉड आणि कोयता या शस्त्रांचा वापर करुन बेसावध झोपलेल्या सौरभवर हल्ला करुन त्याला ठार केले. त्यानंतर घरी आल्यानंतर तो झोपी गेला. दुस-या दिवशी सकाळपासून तो फरार झाला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व त्यांचे सहकारी समाधान पाटील करत आहेत.

सौरभची हत्या करुन इश्वरला त्याचे दहा हजार रुपये तर मिळालेच नाही उलट त्याच्या नशिबी जेलमधे जाण्याचे भोग आले. तरुणपणात संताप आणि अहंभाव दुखावल्यामुळे कित्येक तरुणांचा संयम सुटतो आणि त्यांच्या हातून एखादा गुन्हा घडतो. इश्वर आणि सौरभसारखे तरुण या जगात अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतात. शिक्षणासह संस्कृतीचा अभाव अशा तरुणांमधे प्रकर्षाने जाणवतो. मात्र तरुण पिढी अशीच नशेच्या आणि गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करत राहीली तर या देशाचे भविष्य अंध:कारमय आहे यात दुमत नसावे. या देशाला आणि समाजाला घडवणा-या तरुणांची आज नितांत गरज आहे. त्यासाठी बिघडलेल्या तरुण पिढीला योग्य ते प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तरुणांना घडवणारा शैक्षणीक घटक जरी समाजात तयार असला तरी स्वत:ला घडवण्याची जिद्द तरुणांच्या मनात निर्माण होणे तेवढेच गरजेचे आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here