जळगाव : केस मागे घेण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात तरुणावर चाकू हल्ला करणा-या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण दोघे रा. आदीत्य चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तुषार इश्वर सोनवणे हा रामेश्वर कॉलनीतील रहिवासी तरुण जैन व्हॅलीच्या दिशेने त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात होता. वाटेत सनी जाधव, शुभम पाटील, सचिन कोंडा आणि गोलू चौधरी अशा चौघांनी त्याला अडवले. आपल्याविरुद्ध दाखल केलेली केस मागे घे असे सनी जाधव याने तुषार सोनवणे यास म्हटले होते. केस मागे घेण्यास तुषार सोनवणे याने नकार दिला. त्यामुळे संतापाच्या भरात सनी जाधव याने तुषारच्या हातावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तुषार जखमी झाला. दरम्यान सनीसोबत असलेल्या इतरांनी तुषार यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण या दोघांना पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली पथकाने अटक केली आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. जितेंद्र राठोड, पो.ना. इम्रान सैय्यद, किशोर पाटील, सचिन पाटील, शुध्दोधन ढवळे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. सदरचा गुन्हा घडल्यापासुन आरोपी फरार होते. सनी जाधव हा एमआयडीसी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मारामारी, दरोडयाचा प्रयत्न, घरात घुसुन अश्लील शिवीगाळ करणे यासारखे एकुण दहा गुन्हे दाखल आहेत.