जळगाव : शेतक-याच्या शेतातील कापूस चोरुन नेणा-या चोरट्यास पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या कापसासह अटक केली आहे. चोरुन नेलेला कापूस संबंधीत शेतक-यास परत देण्यात आला.
हिरापूर येथील शेतकरी पांडुरंग ईश्वर पाटील यांनी त्यांच्या शेतात वेचलेला 30 किलो कापूस चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पांडुरग पाटील यांनी पारोळा पोलिस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासात जगदीश बापू पाटील रा. तांबोळे याचा या चोरीत सहभाग उघड झाला. पारोळा येथील कापूस व्यापारी लखन वाणी यांना त्याने चोरीचा कापूस विकला होता. सीसीटीव्ही फुटेजमधे देखील तसे दिसून आले.
जगदीश पाटील यास चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला अटक केल्यानंतर चोरीचा कापूस हस्तगत करण्यात आला. न्या. के.के. माने यांच्या आदेशाने पो.नि. रामदास वाकोडे व तपासी अंमलदार प्रविण पाटील यांनी शेतकरी पांडुरंग पाटील यांना कापूस परत देण्यात आला.