जळगाव : लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करुन बनावट सह्या करणा-या ऑफीसबॉयसह टोळक्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळक्यातील ऑफीसबॉयसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरात सुबोध चौधरी यांची समृद्धी केमिकल्स प्रा. लि. व त्यांचा भाऊ सुनिल चौधरी यांची सुबोनियो केमिकल्स फार्मास्युटीकल्स कंपनी आहे. समृद्धी केमिकल्स मधे विशाल पोपट डोके (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) नावाचा ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. ऑफीस बॉय विशाल डोके याच्यासह काही जणांनी संगनमत करुन दोन्ही कंपन्यांच्या चेकवर बनावट सह्या करुन 46 लाख 87 हजार 752 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 ऑक्टोबर 2021 ते 16 सप्टेबर 2022 दरम्यान विशाल डोके याने केलेल्या बनावट सहीचे चेक वेळोवेळी बॅंकेतून वटलेले आहेत.
सुबोध चौधरी यांच्या मालकीच्या समृद्धी केमिकल्स या कंपनीशी कोणताही व्यवहार नसलेले इसम संजय मणीलाल छेडा, रा. गणेश कॉलनी, जळगाव, लतीफ कमरुद्दीन पिंजारी, रा. पिंप्राळा, जळगाव, पूनमचंद रामेश्वर पवार, रा. सिंधी कॉलनी, जळगाव, प्रल्हाद सुनील माचरे, अविनाश कोमल पाटील, रा. पिंप्राळा जळगाव, मयूर जमनादास बागडे, विजय आनंदा सैंदाणे, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव अशा सर्वांच्या नावाने वेळोवेळी बनावट बिल तयार एकुण 24 लाख 60 हजार 562 रुपये तसेच सुनिल चौधरी यांच्या मालकीच्या सुबोनियो केमिकल्स प्रा. लि. या कंपनीशी कोणताही व्यवहार नसलेले इसम लतीफ कमरुद्दीन पिंजारी, रा. पिंप्राळा, जळगाव, प्रल्हाद सुनिल माचरे, रा. शिवाजी नगर जळगाव, पुनमचंद रामेश्वर पवार, रा. सिंधी कॉलनी, जळगाव, अविनाश कोमल पाटील, रा. पिंप्राळा जळगाव, मयुर जमनादास बागडे, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव, विजय आनंदा सैंदाणे रा. सुप्रीम कॉलनी जळगाव याच्या नावाने एकुण 12 लाख 30 हजार 759 रुपयांचे वेळोवेळी बनावट बिल तयार केल्याचे उघड झाले आहे.
समृद्धी केमिकल्स या कंपनीसोबत पुर्वी व्यवहार असलेले अनिल रामदास चौधरी, विजय विश्वनाथ देशमुख, बबलु जगदीश वंजारी, सुनिल किसन चौधरी यांच्या नावाने एकुण 10 लाख 60 हजार 737 रुपयाचे तसेच सुबोनियो केमिकल्स या कंपनीसोबत पुर्वी व्यवहार असलेले विजय विश्वनाथ देशमुख, सुनिल किसन चौधरी, विनोद गणेश रुढे, बबलु जगदीश वंजारी, अनिल रामदास चौधरी यांच्या नावाने एकुण 3 लाख 51 हजार 694 रुपयांचे अशा दोन्ही कंपन्याचे एकुण 14 लाख 12 हजार 431 रुपयांच्या बिलांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या चेकवरील अकाऊंट पेयी या चिन्ह्यांच्या जागी बनावट सह्या करुन बेअरर चेक तयार करण्यात आला. या बेअरर चेकची रक्कम वटवून विशाल डोके याने दोन्ही कंपन्यांमधे अपहार केल्याचे देखील आढळून आले आहे. दोन्ही कंपन्यांमधे एकुण 46 लाख 87 हजार 752 रुपयांच्या अपहाराच्या तपासात विशाल पोपट डोके, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, लतीफ कमरुद्दीन पिंजारी, रा. पिंप्राळा, जळगाव, प्रल्हाद सुनील माचरे, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव आणि मयूर जमनादास बागडे, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव यांना 20 ऑक्टोबर 2022 रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्या. श्रीमती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता 26 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी, इमरान सय्यद, सतीश गर्जे, संदीप धनगर, साईनाथ मुंडे आदींनी या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला. उर्वरीत आरोपींचा शोध सुरु असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहे.