जळगाव : धावत्या बसचा दरवाजा उघडून दारात उभी असलेली महिला पडून जखमी झाल्याप्रकरणी महिला वाहकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता लोखंडे रा. पाचोरा असे गुन्हा दाखल झालेल्या महिला वाहकाचे नाव आहे.
18 ऑक्टोबर रोजी जळगाव पाचोरा (एमएच 13 सियु 6908) क्रमांकाची बस पाचोरा गावाच्या दिशेने जात होती. वाटेत वावडदा येथील वृद्ध महिला जनाबाई गोपाळ यांच्या सुनबाई प्रतिभा गोपाळ या प्रवासासाठी त्या बसमधे चढल्या. दरम्यान बसच्या दरवाजाची कडी व्यवस्थित बसली नसल्यामुळे धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे वाटेत हॉटेल स्वप्निलनजीक प्रतिभा गोपाळ या बसमधून खाली पडून जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली.
या अपघातास बस वाहक सविता लोखंडे यांना जबाबदार धरुन प्रतिभा गोपाळ यांची सासु जनाबाई गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि. 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करत आहेत.